बाप ज्ञानेश्वर समाधीस्त…!

आळंदी – नामा म्हणे आता लोपला दिनकर | बाप ज्ञानेश्वर समाधीस्त ||

भगवान श्री ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा हा वारकरी संप्रदायातील एक ऱ्हदयस्पर्शी क्षण आहे. संप्रदायाचा पाया ज्ञानोबारायांच्या रूपाने आजही संजीवन आहे. आज ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याचा दिवस. असा हा समाधी सोहळा पुन्हा होणे नाही. देव, संत आणि गुरू हे एकावेळी माऊलींच्या समाधी सोहळ्याला उपस्थित होते.

संत नामदेव महाराजांनी या सर्वांचा उल्लेख समाधीच्या अभंगामध्ये केलेला आहे. ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याला महानसंत कान्होबा पाठक यांचे कीर्तन झाले होते. चोखोबाराय, मुक्ताबाई, सोपानकाका, निवृत्तीनाथ महाराज, नामदेव महाराज आदिकरून जपीतपी ऋषी वैष्णव मंडळी उपस्थित होते. जगाचा मालक पांडुरंग परमात्मा या सोहळ्याला आले होते. काय प्रसंग असेल तो..

समाधी सोहळ्याचं प्रकरण वाचलं तरी आजही वारकऱ्यांचे, भाविकांचे ऱ्हदय भरून येते. पांडुरंगाचे स्वत: सोपन काकांनी त्यांचं स्वागत केले. इंद्रायणीच्या तिरावर ही सर्व मंडळी गोळा झाली. धन्या इंद्रायणी पिंपळाचा पार | धन्य ज्ञानेश्वर पुण्य भूमी || दशमीच्या दिवशी ही सर्व मंडळी जमा झाली होती. दशमी, एकादशी, द्वादशी या दिवशी प्रदक्षिणा, हरिकीर्तन, जागर असे अनेक कार्यक्रम झाले. द्वादशी सोडण्यासाठीचा स्वयंपाक प्रत्यक्ष रुक्‍मीनी मातेने केला होता. तर स्वत: पांडुरंग परमात्मा सर्व वैष्णवांना जेवण वाढत होते.

कार्तिकी त्रयोदशीचा दिवस उजाडला. सर्व वैष्णव सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ जमा झाले होते. प्रचंड गर्दी होती. समाधीची वेळ जवळ आली होती. प्रत्येकांनी ज्ञानोबारायांचे दर्शन घेतले. समाधीची जागा नामदेवरायांच्या चारही मुलांनी स्वच्छ केली. नारा विठा गोंदा महादा पाठविला | झाडविली जागा समाधीची ||

ज्ञानोबारायांनी सर्वप्रथम पांडुरंगाचं दर्शन घेतले. देव म्हणतात, माऊली काहीतरी वरदान मागा.. तेव्हा ज्ञानोबारायांनी पंढरपूरला शुद्ध वारी भरते त्याचप्रमाणे वद्य वारीचा मान मागुन घेतला. तेव्हा पासून प्रत्येक वद्य वारीला भगवान व वारकरी वैष्णव मंडळी आळंदीला येतात. ही परंपरा आज तागायत सुरू आहे. चंद्रसुर्य असेपर्यंत ती अशीच सुरू राहील. या करोनाच्या वैश्विक संकटामध्येही परंपरा अबाधीत आहे.

पुढे ज्ञानोबाराय निवृत्तीनाथांचे दर्शन घेतात. सतत निवृत्तीमध्ये असणारे निवृत्तीनाथ महाराज आज प्रवृत्तीमध्ये येऊन ढसाढसा रडत होते. अमर्यादा कधी केली नाही येणे | गुरूशिष्यपण सिद्धी नेले || निवृत्तीनाथांना रडाताना पाहून सर्व वैष्णव मंडळी धायमोकलून रडू लागली. नदिचीया माशा घातले माजवण | तैसे जणवण कालवले | बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट | ओघ बारा वाटा मुरडती ||

मुक्ताबाई ज्ञानोबारायांना आलिंगन देऊन रडते. म्हणते, आई वडील गेले तेव्हा येवढं दु:ख झालं नाही. ज्ञानोबाराय समाधी विवरामध्ये जात असताना देव निवृत्ती धरीले दोन्हा कर | जातो ज्ञानेश्वर बैसावया || ज्ञानोबाराय जसजसे पाऊल समाधी विवरात टाकतात तसतसा वारकरी वैष्णवांच्या काळजाचा ठोका चुकतो की काय अशी परिस्थिती झाली होती. हळु हळु सुर्य मावळतो तसा हा ज्ञान सुर्य आज मावळला असे नामदेव महाराजांनी वर्णन केले आहे. नामा म्हणे आता लोपला दिनकर | बाप ज्ञानेश्वर समाधीस्त ||
कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानोबाराय समाधीस्त झाले. या वर्षी माऊलींचा 724 वा संजीवन समाधी सोहळा आहे. 13 डिसेंबर रोजी माऊलींचा संजीवन समाधी दिन आहे.

लेखक – ह.भ.प. महंत जगन्नाथ महाराज शास्त्री (जगदंब गड, कारेगाव)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.