मुंबई- दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन सध्या कुठे आहेत? त्यांचे भाजपशी काय नाते आहे, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. काल संजय राऊत यांनी एक ट्विट केले होते. त्याला पूनम महाजन यांनी आक्षेप घेत संजय राऊतांवर जोरदार टीका केली होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत बोलत होते.
कार्टुन हे महाजनांवर व्यक्तिगत टीका करणारे नव्हते. त्या काळात भाजप आणि शिवसेनेची काय ताकद होती हे अधोरेखित करणारे हे ट्विट होते. भाजप नेत्यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर ते कार्टुन पोस्ट केले होते. हे ट्विट डिलीट केले असले तरी जिथे पोहोचायचे तिथे पोहोचले आहे.
ते कार्टून मी काढलं नाही. आरके लक्ष्मण यांनी काढले आहे. त्यावेळी शिवसेना काय होती हे त्यातून दिसते. मी व्यक्तिगत रित्या प्रमोद महाजनांवर टीका केली नाही. ते भाजपचे नेते होते. बाळासाहेब त्यांच्यावर प्रेम करायचे. पूनम आता कुठे आहेत मला माहीत नाही. भाजपमध्ये महाजन परिवार, मुंडेंचं कुटुंब असो की मनोहर पर्रिकराचं कुटुंब असेल सर्वांना अंधारात ढकलले आहे. त्यामुळे भाजपमध्ये तुम्ही कुठे आहात हे मी पूनम यांना विचारू इच्छितो. पण मी त्यांची टीका वैयक्तिक घेत नाही. त्यांना माझे म्हणणे आवडले नसेल, त्यांच्या वडिलांबाबत तर मीही अस्वस्थ आहे. कारण महाजन कुटुंबाशी माझे चांगले संबंध आहे, असे राऊत म्हणाले.
या कार्टुनमध्ये सुरुवातीचा युतीचा काळ आला आहे. भाजप नेत्यांनी काल जी वक्तव्य केली होती त्यांना त्यावेळी भाजप काय होती हे दाखवण्यासाठी व्यंगचित्र दाखवले. त्यावरून पूनम महाजन यांना अस्वस्थ होण्याचे कारण नव्हते. यावेळी त्यांनी दिल्ली काबीज करण्याच्या विधानावरही सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली.
दिल्ली काबीज करणे म्हणजे सर्व पक्षांना एकत्र घेऊन भाजपला सत्तेतून हटवणे. त्यालाच दिल्ली काबीज करणे म्हणतात. आज एक दोन व्यक्तिंच्या हातात दिल्ली आहे. दिल्लीवर देशाचे वर्चस्व पाहिजे. दिल्ली देशाची आहे. एखाद्या राजकीय पक्षाची किंवा एखाद दुसऱ्या व्यक्तिची नाही, असेही त्यांनी नमूद केले.