मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे स्वयंभू असल्याचे म्हंटले होते. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या या विधानावर भाष्य केलं आहे. यावेळी राऊत यांनी थेट शेंदूर फासलेल्या दगडाची उपमा दिल्याचे पाहायला मिळाले.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी विवध विषयांवर भाष्य केले. राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर बोलताना ते म्हणाले,”होय आम्ही स्वयंभूच आहोत शेंदूर फासलेले दगड नाही. स्वयंभू दैवतं असतात त्यांच्या मागेच जनता जाते. शेंदूर फासलेल्या दगडांच्या मागे जात नाही” असंही राऊत यावेळी म्हणाले.
“काही जण दगडांना शेंदूर फासतात आणि यांना नमस्कार करा असं सांगतात पण लोक नमस्कार करत नाहीत. जे स्वयंभू असतात त्या स्वयंभू नेत्यांना आणि देवतांना मान मिळतो. ते स्वयंभू नेते ठाकरे कुटुंबीय आहेत. यामुळे जर कुणाला पोटदुखी होत असेल तर त्यांनी सांगावं आमच्याकडे उपचार आहेत” असा टोला देखील यावेळी संजय राऊत यांनी राज ठाकरेंना नाव न घेता लगावला.
काय म्हणाले होते नेमकं राज ठाकरे
एका मुलाखतीदरम्यान राज ठाकरेंना रॅपिड फायर प्रश्नाची उत्तरे विचारण्यात आली होती. यावेळी कोणाला कोणता सल्ला द्याल असं विचारून राज ठाकरेंसमोर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं. त्यावर राज ठाकरे म्हणाले, मी यांना काय सल्ला देणार दोघेही स्वयंभू आहेत.