नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. त्यातच देशातील प्रत्येक राज्यात आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत असून नागरिकांचे प्राण जात आहेत. दरम्यान, देशातील या परिस्थितीवर आता जागतिक स्तरावर चर्चा सुरु झाली आहे. देशातील या परिस्थितीला केंद्र सरकारचा निष्काळजीपणा आणि त्यांची धोरणे जबाबदार असल्याचे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी म्हटले होते. यावर आता शिवसेने नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना आपली भूमिका मांडली आहे.
संजय राऊत म्हणाले,’भारताचे चित्र आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी ज्या पद्धतीने निर्माण केलं जात आहे. हे मोठं षडयंत्र असू शकतं. या षडयंत्रने मागे भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याच्या उद्देश असू शकतो.’
ते पुढे म्हणाले,’ आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांद्वारे राष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत असेल तर त्यात राजकारण करण्याची गरज नाही. अशा वेळी सर्वानी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठी उभं राहिलं पाहिजे. मोदी जे धोरण बनवतील त्याच्यामागे उभं राहिलं पाहिजे. त्याविरोधात आपण सर्वांनी एकत्रं येऊन लढलं पाहिजे.’ असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे
दरम्यान, देशातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत जगभरातील माध्यमांनी भारताला दोष दिला असून टीकेचा चढा सूर लावला आहे. दुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे. काही ठिकाणी त्याचा काळा बाजारही होत आहे. दिल्लीत रुग्णच प्राणवायू सिलिंडर घेऊन येताना दिसले. गेल्या वर्षी स्थलांतरितांचे जे लोंढे दिसले त्याची पुनरावृत्ती यावेळीही झाली. या वास्तवाचे तपशिलात वृत्तांकन आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केलेले आहेच, पण परदेशी दैनिकांच्या वृत्तलेख व संपादकीयांनी भारतीय नेतृत्वाच्या गफलतींचाही पाढा वाचला आहे.
‘‘पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या स्वत:च्या आकलनाने काही निर्णय घेतले. तज्ज्ञांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले, त्यांच्या चुकांचे परिणाम आज भोगावे लागत आहेत’’ असे ब्रिटनच्या नामांकित वृत्तपत्राने अग्रलेखात म्हटले आहे. ‘‘नरेंद्र मोदींच्या अतिआत्मविश्वासामुळे हे सारे घडले. मोदींनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्बंध कसे राखावेत याचा विचार करायला हवा होता. आपण जे बोलतो ते करतो हे दाखवायला हवे होते. भविष्यातील इतिहासकार या निर्णयांबाबत मोदींचे कठोर मूल्यमापन करतील,’’ असेही या अग्रलेखात म्हटले आहे.