Sanjay Raut : राज्यात मागील काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांचे सलीम कुत्तावरून आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे दिसून येत आहे, त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सलीम कुत्तासोबतची पार्टी भाजप पदाधिकाऱ्याने आयोजित केली होती, असा गंभीर आरोप केला आहे. पदाधिकारी व्यंकटेश मोरेचे फडणवीसांसोबतचे फोटो दाखवत राऊतांनी हा आरोप केला आहे.
आज माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या व्हिडीओवरून हे राजकारण सुरु असल्याचा आरोप केला. याविषयी बोलताना त्यांनी,”भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा व्हिडीओ बडगुजर यांनी दिलेला नाही. मकाऊचा व्हिडीओ चर्चेत आल्याने सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, मकाऊचा बावनकुळेंचा व्हिडीओ बडगुजर कुटुंबांनी दिला म्हणून बडगुजरांवर कारवाई करण्यात आल्याची शक्यता आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे माझे दैवत आहे. त्यांची शपथ घेऊन सांगतो की, बावनकुळेंच्या व्हिडीओचा बडगुजर यांच्याशी काहीही संबंध नाही. संघ परिवार विशेषतः नागपूरवाल्यांना माहिती आहे की तो व्हिडीओ कसा आला आहे.” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.
पुढे त्यांनी,”सलीम कुत्तासोबतच्या पार्टीचे आयोजन भाजप पदाधिकाऱ्याने केले होते. व्यंकटेश मोरेच्या पार्टीला बडगुजर यांना आमंत्रण देण्यात आले होते. त्या (कुत्ता) संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला? गृहमंत्री कोण होते त्याची चौकशी करा… तो एवढा बॉम्बस्फोटामधला भयंकर गुन्हेगार होता तर त्याला तुरूंगातून कोणी सही करून सोडले. याचा तपास भाजपने करावे आणि मग आमच्याकडे बोट दाखवा. आजही व्यंकटेश नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारी आहे. त्याने सर्वपक्षीयांसाठी पार्टी आयोजित केली असेल तर आपली परंपरा आहे. भाजपमधील सलीम कुत्ताच्या सहकाऱ्यांनी जे प्रश्न विचारतायत त्यांनी आधी स्वतःकडे बघावं,” असे म्हणत भाजप आमदार नितेश राणेंवर नाव न घेता निशाणा साधला आहे.