संगमनेर (प्रतिनधी) – संगमनेर तालुक्यात धांदरफळ बुद्रुक येथील मयत वृद्धासह आठ जण, तर संगमनेर शहरातील कुरण रोड येथील एक, असे दोन दिवसांत तब्बल नऊ जण करोनाबाधित सापडल्याने संगमनेरचे नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. प्रशासनानेही कठोर पावले उचलली असून, संगमनेर शहराचा काही भाग व तालुक्यातील कुरण व धांदरफळ ही दोन्ही गावे हॉटस्पॉट जाहीर करण्यात आली आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दिली.
हॉटस्पॉट भागातील अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकाने 23 मे पर्यंत बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तसे आदेश दिले आहेत. यापूर्वीही संगमनेर तालुक्यात आठ रुग्ण सापडले होते. उपचारानंतर हे आठ जण करोनामुक्त झाले होते. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, शुक्रवारी आणि शनिवारी सापडलेल्या आठ रुग्णांपैकी एक जण संगमनेर शहरातील असून, उर्वरित सात हे तालुक्यातील धांदरफळ येथील आहेत. हे रुग्ण सापडल्यामुळे आता संगमनेर तालुक्यावर पुन्हा प्रशासनाने लक्ष केंद्र केले आहे. तसेच हॉटस्पॉट एरियात पत्रकारांना जाण्यास बंदी केली आहे.
हॉटस्पॉट व कोअर एरिया जाहीर झालेल्या भागातील नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी संगमनेर येथे 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे. या कक्षासाठी तीन ते चार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आली आहे. नियंत्रण कक्षातील रजिस्टरवर येणाऱ्या फोनची नोंद घेऊन तक्रारी सोडवल्या जाणार आहेत. तसेच नागरिकांना आवश्यक दूध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे आदीबाबी योग्य ते शुल्क आकारून सरकारी यंत्रणेमार्फत पुरविण्यात येणार आहे. याभागात उपविभागीय अधिकारी हे संनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. या क्षेत्रातील सर्व बॅंकांनी बॅंकिंगसुविधा बॅंक प्रतिनिधीमार्फत उपलब्ध करुन द्याव्यात, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी संगमनेर येथे जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शनिवारी संगमनेर व तालुक्यातील धांदरफळ येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी करीत आढावा घेतला. संगमनेर येथील स्थानिक अधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत त्यांना आवश्यक त्या सूचनाही त्यांनी दिल्या. संगमनेर शहरात येणारे रस्ते प्रशासनाने बंद केले आहेत. अकोले नका, 132 केव्ही, घुलेवाडी चौफुली, समनापूर चौफुली, कुरण गावात जाणारा रस्ता संगमनेर खुर्द, चौफुली असे शहरात येणारे सर्व रस्ते प्रशासनाने बंद केले आहेत.