मुंबई – आपण मागासवर्गीय असल्यानेच एनसीबीचे अधिकारी आपला अपमान आणि छळ करीत असल्याचा आरोप नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) मुंबईचे माजी झोनल संचालक समीर वानखेडे यांनी केला आहे. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणात आपला आर्यन खान याला न अडकवण्यासाठी समीर वानखेडे याने सुपरस्टार शाहरुख खानकडून 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप असून या प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे.
या संदर्भात सीबीआयने वानखेडे यांना गुरुवारी मुंबईत चौकशीसाठी बोलावले होते, परंतु वानखेडे सीबीआय समोर हजर झाले नाहीत. उलट त्यांनी एनसीबीचे अधिकारी आपण मागासवर्गीय असल्याने आपला अवमान आणि छळ करीत आहेत अशी तक्रार वानखेडे यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग तसेच मुंबई पोलिसांकडे केली आहे.
एनसीबीचे तत्कालीन उपसंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली वानखेडे यांच्यावरील आरोपींची चौकशी करण्यासाठी एक एसआयटी नेमण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार वानखेडे आणि अन्य अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वानखेडे यांनी ज्ञानेश्वर सिंह यांच्या विरोधातच ऍट्रॉसिटी ऍक्ट खाली तक्रार दाखल केली आहे.