पुणे -महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. या वेतन वाढीनुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या बिलांमध्ये संगणकीय बदल करावे लागणार आहेत. यासाठी उशीर होत असल्याने महापालिकेच्या तब्बल 18 हजार कर्मचाऱ्यांचे डिसेंबरचे वेतन झालेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधे नाराजीचा सूर आहे.
दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांची वेतन बिले तयार आहेत, अशा कर्मचाऱ्यांचे वेतन तातडीनं देण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने लेखापाल विभागास दिले आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या वेतनाची बिले तयार करण्यासाठी 20 अतिरिक्त कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
डिसेंबरचे वेतन न मिळाल्याने क’ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची, तसेच वेतनावर घर तसेच इतर कारणांसाठी कर्ज घेतलेल्या कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे. वेतन वेळेत न झाल्याने या कर्मचाऱ्यांना कर्जाचे हप्ते भरता आलेले नाहीत. त्यामुळे तातडीने वेतन करण्याची मागणी कामगार संघटनांकडून करण्यात येत होती.