वाठार स्टेशन – लोणंद-सातारा मार्गावर वाठार स्टेशन येथील काळी मोरी येथे ट्रॅक्टरने मोटासायकलला शुक्रवारी सकाळी 11.45 च्या सुमारास दिलेल्या धडकेत बाळासाहेब रावसाहेब भोईटे (वय 59, रा. सुरवडी, ता. फलटण) यांचा जागीच मृत्यू झाला. साखरवाडी, ता. फलटण येथील श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याच्या शेती विभागात ते काम करत होते.
याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बाळासाहेब भोईटे हे कारखान्याच्या कामासाठी मोटारसायकल (एमएच-11-सीडी-3455) वरून शुक्रवारी सकाळी 11.45 च्या सुमारास गुळुंब, ता. वाई परिसरातील ऊस पाहणीसाठी निघाले होते. शरयू कारखान्यात ऊस घालून आलेल्या ट्रॅक्टरने भोईटे यांच्या मोटारसायकलला वाठार स्टेशन येथील काळी मोरी येथे पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात डोक्याला गंभीर मार लागून भोईटे यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रॅक्टरचालक सागर विजय मसुगडे (रा. धर्मपुरी, माळशिरस) हा ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन पळून गेला. त्याला पोलिसांनी पिंपोडे बुद्रुक येथे नागरिकांच्या मदतीने पकडले. हा ट्रॅक्टर नवा असून त्याच्यावर नंबरप्लेट नव्हती. अपघाताची माहिती मिळताच भोईटे यांचे नातेवाईक व कारखान्याच्या शेती विभागातील अधिकारी हजर झाले. भोईटे यांचा मृतदेह विच्छेदनासाठी पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघाताची नोंद वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात झाली असून, पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर तपास करत आहेत.