मुंबई – मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘सहेला रे’ हा चित्रपट लवकरच प्लॅनेट मराठी या ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे आणि सुमित राघवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘काही नात्यांना नाव नसतं’, अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात मैत्रीच्या पलीकडचे एक संवेदनशील नाते पाहायला मिळणार आहे.
येत्या १ ऑक्टोबर रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुबईमध्ये झालेल्या ‘एक्स्पो २०२० दुबई’ या सोहळ्यात ‘प्लॅनेट मराठी’च्या ‘सहेला रे’ या चित्रपटाचे टीझर लाँच करण्यात आले होते. गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. तर नुकताच ५ वा इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ बोस्टनमध्येही ‘सहेला रे’च्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते.
अनेक नामांकित फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावणाऱ्या या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी ‘सहेला रे’ची कथा, पटकथा आणि संवादही मृणाल कुलकर्णी यांनी लिहिले आहे. कौटुंबिय नाते संबंधांवर या चित्रपटातून भाष्य केले जाणार आहे. कोरोनानंतरच्या बऱ्याच कालावधीनंतर एक चांगला कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे येणार आहे.