जयपूर ( sachin pilot on ashok gehlot )- राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना कॉंग्रेसचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष बनवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गेहलोत नव्या भूमिकेत दिसणार का याविषयीची उत्सुकता राजस्थानात शिगेला पोहचली आहे.
कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र, पक्षाचे नेते राहुल गांधी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्यास अनुत्सूक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गांधी परिवाराबाहेरील नेत्याला अध्यक्ष बनवण्याच्या पर्यायावर कॉंग्रेस विचार करत आहे. त्या पदासाठी गेहलोत यांच्या नावाला पसंती असल्याचे संकेतही मिळत आहेत.
त्यामुळे गेहलोत खरोखरीच नव्या भूमिकेत दिसणार का, हा राजस्थानात मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर, पत्रकारांनी बुधवारी कॉंग्रेसचे तरूण नेते सचिन पायलट यांना गेहलोत यांच्याविषयीचा प्रश्न विचारला. गेहलोत कॉंग्रेसचे पुढील अध्यक्ष बनतील की नाही याविषयी थेट उत्तर देण्याचे पायलट यांनी टाळले.
कॉंग्रेस नेतृत्वाने दिलेल्या आदेशाचे पालन आम्ही करू, एवढेच माफक उत्तर देत त्यांनी सस्पेन्स आणखी वाढवला. त्यामुळे आणखी काही दिवस तरी गेहलोत यांच्याविषयीचे कुतूहल कायम राहणार असल्याचे सूचित होत आहे.