नवी दिल्ली : सध्या करोनाने जगभरात हैदोस घातला आहे. जगभरातील ३२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. तर २ लाख ३० हजारांपेक्षा अधिक लोकांचा करोनाने मृत्यू झाला आहे. यादरम्यान रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. करोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. यानंतर त्यांनी संपूर्ण कामकाजाची धुरा उपपंतप्रधानांकडे सोपवली आहे.
रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन यांनी गुरूवारी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना याबाबत माहिती दिली. यावेळी मिखाइल मिशुस्तिन यांनी टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. तसेच उपपंतप्रधान अँड्री बेलूसोव यांच्याकडे त्यांच्या अनुपस्थितीत कामकाजाची धुरा सोपवण्याची विनंती केली. यानंतर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या या प्रस्तावाचे समर्थन केले.