Russia Ukraine War – रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील (Russia Ukraine War) एका गावातील किमान 59 सामान्य नागरिक ठार झाले आहेत. सर्वसामान्य नागरिकांवर करण्यात आलेल्या या क्षेपणास्त्र हल्ल्याचा पारदर्शक तपास करण्यात यावा, अशी सूचना संयुक्त राष्ट्राच्या तपास एजन्सीने रशियाला केली आहे.
हा क्षेपणास्त्र हल्ला कसा झाला, हे शोधून काढण्यात यावे, या हल्ल्यातील मृतांना नुकसानभरपाई देण्यात यावी आणि जबाबदार व्यक्तींवर कावाई करण्यात यावी, अशी मागणीही संयुक्त राष्ट्राच्यावतीने रशियाकडे करण्यात आली.
युक्रेनमधील रोझा या गावातील कॅफेवर 5 ऑक्टोबर रोजी हा क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. रशियाविरुद्धच्या युद्धात लढत असताना वीरमरण आलेल्या एका स्थानिक सैनिकाला आदरांजली वाहण्यासाठी गावातील अनेक लोक एकत्र जमले असतानाच हा क्षेपणास्त्र हल्ला झाला होता.
या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये 36 महिला, 22 पुरुष आणि 8 वर्षे वयाच्या एका मुलाचा मृत्यू झाला होता. या व्यतिरिक्त अनेक मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेल्या होत्या. त्या सर्वांची ओळख पटवण्यासाठी तब्बल आठवडा लागला होता.
रशियाच्या इस्कंदर या लघुपपल्ल्याच्या क्षेपणास्त्रामुळे ही जीवितहानी झाल्याचे निश्चित आहे, असे संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क एजन्सीने म्हटले आहे. घातक क्षेपणास्त्र नागरी वस्तीवर डागले जात असल्याकडे रशियाने दुर्लक्ष केले असावा किंवा रशियाने ते डजाणीवपूर्वक नागरी वस्तीवर डागले असावे, असेही एजन्सीने म्हटले आहे.