ट्विटरमध्ये व्यापक बदलाची प्रक्रिया सुरू असून यात भारतीय वंशाच्या श्रीराम कृष्णन यांची मोठी भूमिका मानली जात आहे. श्रीराम हे ट्विटरबरोबर काम करत असताना कंपनीच्या नफ्यात घसघशीत वाढ झाली. ट्विटरच्या वेगवेगळ्या फीचर्ससाठी शुल्क आकारणीचा प्रस्तावही श्रीराम यांनीच सुचवला असल्याचे सांगितले जाते. भारतीयांना पुन्हा ट्विटरमध्ये सामावून घेतले जाण्याची शक्यताही आता वाढली आहे. ऍलन मस्क यांना श्रीराम यांच्यामुळे पुन्हा भारतीय बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवावा लागणार आहे. ऍलन मस्क यांच्या व्यावसायिक बुद्धिमत्तेला श्रीराम यांच्या भारतीय बुद्धिमत्तेची जोड मिळाल्यामुळे ट्विटरची चिमणी आणखी मोठी झेप घेईल, असे दिसते.
आजघडीला भारतीय बुद्धिमत्तेचा डंका परदेशात खूपच वाजत आहे. ब्रिटनमध्ये ऋषी सुनक हे पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर आता अमेरिकेत श्रीराम कृष्णन यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. टेस्लाचे सर्वेसर्वा ऍलन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या पुनर्रचनेत मदत करणाऱ्यांत श्रीराम कृष्णन यांचे नाव आघाडीवर आहे.
योगायोगाने भारतीय वंशाचे सीईओ पराग अग्रवाल यांच्या जागी येणारे श्रीराम हे मस्क यांचे सहकारी झाले आहेत. मस्क यांनी अलीकडेच ट्विटरची 44 अब्ज डॉलरमध्ये खरेदी केली. आता ट्विटरमध्ये व्यापक बदलाची प्रक्रिया सुरू असून यात श्रीराम यांची मोठी भूमिका मानली जात आहे.
सध्या ट्विटरमध्ये प्रशासकीय पातळीवर बदल होत असून त्याचे सूत्रधार श्रीराम असल्याचे सांगितले जात आहे. चेन्नईत जन्मलेले श्रीराम यांनी ट्विटरवर आपण आता ऍलन मस्क यांना मदत करत आहोत, असे जाहीर केले. श्रीराम हे सध्या अमेरिकेतील नामांकित गुंतवणूक कंपनीत कार्यरत असून त्यांचे काम स्टार्टअप्सची रणनीती आणि विस्तार आखण्याचे आहे. वास्तविक इंजिनिअर श्रीराम यांची अमेरिकेतील स्टार्टअप्समधील मोठ्या गुंतवणुकीमुळे ओळख झाली आहे. ते अमेरिेकेतील अनेक नामांकित कंपनी आणि क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यावरून चर्चेत आहेत.
श्रीराम यांच्या करिअरची सुरुवात 2007 मध्ये मायक्रोसॉप्ट कंपनीबरोबर झाली. तमिळनाडूच्या अण्णा यूनिव्हर्सिटीच्या एसआरएम कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करणारे श्रीकृष्ण यांनी केवळ 21 व्या वर्षी उज्ज्वल भवितव्यासाठी अमेरिकावारी केली आणि तेथेच स्थायिक झाले. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले श्रीराम यांचे वडील एका विमा कंपनीत काम करत होते.
कॉलेजमध्ये शिक्षणादरम्यान ते आरतीला भेटले आणि या भेटीचे रुपांतर सुरुवातीला प्रेमात आणि नंतर लग्नात झाले. विशेष म्हणजे श्रीराम हे ट्विटरबरोबर काम करत असताना कंपनीच्या नफ्यात घसघशीत वाढ झाली. या कंपनीच्या विकासदरात वीस टक्के वाढ झाली. यादरम्यान फेसबुक आणि स्नॅप यांच्यासमवेत काम करणारे श्रीराम यांना स्टोरीटेलिंगची देखील हौस आहे. ते आरती राममूर्ती यांच्यासमवेत एक बहुचर्चित पॉडकॉस्ट शो देखील चालवतात.
अब्जाधीश उद्योगपती ऍलन मस्क हे ट्विटरमधील नफा वाढविण्यासाठी नवनवीन निर्णय घेत असून त्यामागे श्रीराम यांचेच डोके असल्याचे सांगितले जात आहे. ब्लू टीकच्या बदल्यात शुल्क घेणे आणि एडिट बटण सारखे नवीन फिचर्स आणणे यासारख्या नवीन गोष्टी आणण्याचे श्रेय श्रीराम यांच्याकडे जाते. एकंदरीतच ट्विटरच्या सॅन फ्रान्सिस्को येथील मुख्यालयात महत्त्वाचे निर्णय हे श्रीराम यांच्या
निर्देशानुसारच होत असल्याचे सांगितले जात आहे. म्हणूनच श्रीराम यांनी ऍलन मस्क यांची मदत करत असल्याचे सार्वजनिकरित्या जाहीर केले. अर्थात ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यापक बदल होण्याचे संकेत मिळत होते. काही नवीन फीचर्ससह सुविधांचा विस्तार होण्याची देखील चर्चा होती. याशिवाय ट्विटची शब्दमर्यादा वाढविण्याचा देखील विचार केला जात आहे. आणखी एक महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता असून तो म्हणजे ट्विटर अकाउंट होल्डर हा लॉगआउट नंतरही ट्विट्स आणि स्टोरी पाहू शकेल. या बदलावर काम केले जात असल्याची चर्चा आहे.
सध्या एका वेंचर कॅपिटल फर्ममध्ये कार्यरत श्रीराम यांचे करियरच मूळात शानदार राहिले आहे. 2013 मध्ये फेसबुक व्यवस्थापनाशी ते निगडीत होते. तीन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध पदावर काम करत आक्रमक व्यापारी रणनीती अंगीकारण्याचे धोरण राबविले. यूजर्सच्या मानसिकतेवर प्रभाव पाडणारे श्रीराम यांनी नवनव्या कंपनीत बदल घडवून आणत मोठे लाभ मिळवून दिले. त्यानंतर दोन वर्षांच्या काळात कोअर कंझ्यूमर उत्पादन टीमचे नेतृत्व करत ट्विटरला मोठा फायदा करून दिला. याप्रमाणे याहूबरोबरही त्यांची कारकीर्द उत्साहजनक राहिली.
विशेष म्हणजे याहूवर चॅटींग करताना आरती राममूर्ति यांच्याशी ओळख झाली. श्रीराम-आरती यांना एक कन्या असून आरती यांनी सॅन फ्रान्सिस्को येथे कुटुंब सांभाळण्याबरोबरच नेटफ्लिक्स आणि फेसबुकबरोबरही काम केले आहे. त्या “गूड टाइम’ शोच्या माध्यमातून सिलिकॉन व्हॅलीत चर्चेत राहिल्या आहेत. या शो मध्ये अमेरिकेतील नामांकित उद्योगपती आणि तंत्रज्ञान कंपनीतील दिग्गज व्यक्तींनी पाहुणे म्हणून हजेरी लावली. यात मार्क झुकेरबर्ग आणि ऍलन मस्क यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
तूर्त श्रीराम हे ट्विटरचे नवे मालक ऍलन मस्क यांना मार्गदर्शन करत असल्याने चर्चेत आहेत. ते कदाचित कंपनीचे सीईओ देखील होऊ शकतात. जगातील सर्वात धनाढ्य ऍलन हे श्रीराम यांचे चांगले मित्र आहेत.
बहुआयामी विचार करणारे ऍलन मस्क हे श्रीराम यांच्या मदतीने ट्विटरला जगातील सर्वात प्रभावशाली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून नावारुपास आणू शकतात. सध्याच्या काळात भारतवंशाचे प्रतिभावंत व्यक्ती जगात डंका पिटत आहेत आणि ही एक आनंदाची बाब आहे. मात्र भारतात जन्मलेले आणि शिक्षण घेणारे तरुण मंडळी भारतातच राहून यश का मिळवू शकत नाहीत? याचा विचार करायला हवा. याबाबत सतत बोलणारे राजकीय नेते या प्रतिभावंत लोकांना देशातच चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याविषयी मंथन करणार आहेत की नाही? असाही प्रश्न निर्माण होतो. अमेरिकेतील सर्वात धनाढ्य टेक्नॉलॉजी कंपन्या भारतीय बुद्धिमत्तेच्या जोरावर जगावर राज्य करत आहेत आणि अब्जावधी डॉलरची कमाई करत आहेत. भारतीयांना पुन्हा ट्विटरमध्ये सामावून घेतले जाण्याची शक्यताही यामुळे वाढली आहे. ऍलन मस्क यांना श्रीराम यांच्यामुळे पुन्हा भारतीय बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवावा लागणार आहे.
– प्रांजली देशमुख