लंडन – स्वित्झर्लंडचा सर्वकालीन महान टेनिसपटू आणि टेनिस सम्राट रॉजर फेडररने शुक्रवारी आपला अखेरचा स्पर्धात्मक सामना खेळला. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री झालेल्या लेवर कपमधील दुहेरीच्या या सामन्यात दुसरा महान टेनिसपटू राफेल नदालसह भाग नोंदवला होता. या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला असला तरी, संपूर्ण वातावरण फेडररमय झाले होते. या सामन्यानंतर त्याला आपले अश्रू आवरणे कठीण झाले. यावेळी चाहत्यांसह जोडीदार (Roger Federer’s farewell) राफेल नदालनेही फेडररला भरल्या डोळ्यांनी भावनिक निरोप दिला.
How are we getting over this? @rogerfederer | @RafaelNadal | #RForever pic.twitter.com/cpOfSznp4X
— ATP Tour (@atptour) September 24, 2022
रॉजर फेडररने मागील आठवड्यात निवृत्तीची घोषणा केली होती. लेवर कपमधील दुहेरीचा सामना राफेल नदालसह (Rafael Nadal) खेळून निवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त त्याने केली होती. त्यानुसार या दोघांनी दुहेरीत जॅक सॉक आणि फ्रान्सिस टुआफे यांच्याविरुद्ध दोन हात केले. पहिला सेट जिंकल्यानंतर पुढील दोन सेट अटीतटीचे झाले. पण या महान जोडीला 4-6, 7-6 (2), 11-9 ने पराभवाचा सामना करावा लागला.
या सामन्यानंतर फेडरर म्हणाला, मी अजिबात नाराज नाही. मी जे नेहमी करत आलो, ते आज केले. याचा मला आनंद आहे. माझ्यावर कोणताही दबाव नव्हता.
फेडरलच्या या अंतिम सामन्यात नेहमी त्याचा विरोधक मात्र मैदानाबाहेर मित्र राहिलेला राफेल नदाल ओक्साबोक्शी रडताना दिसला. नोव्हाक जोकोविच व अँडी मरे यांचे देखील डोळे पाणावले होते. या सामन्यानंतर सर्व खेळाडूंनी फेडररला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सोशल मीडियावर देखील त्याच्या निवृत्तीनंतर चाहत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या.
“कोणी विचार केला असेल की त्याचा प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मनात त्याच्याविषयी अशाही काही गोष्टी असू शकतात. हेच खेळाचं सौंदर्य आहे. हे मी पाहिलेले आतापर्यंतचा सर्वात सुंदर ‘स्पोर्ट्स पिक्चर’ आहे. जेव्हा तुमचे सहकारी तुमच्यासाठी रडतात, तेव्हा तुम्ही समजू शकता की देवानं तुम्हाला ही प्रतिभा का दिली आहे?
– विराट कोहली
रॉजर फेडररला 21व्या शतकातील सर्वात महान टेनिसपटू म्हणून ओळखले जाते. 1998मध्ये व्यावसायिक टेनिसला सुरुवात करणाऱ्या फेडररने 2003मध्ये विम्बल्डनच्या रुपाने त्याने पहिले ग्रॅंडस्लॅम जिंकले. त्यानंतर आपल्या आजवरच्या कारकिर्दीत त्याने 8 विम्बल्डन, 6 ऑस्ट्रेलियन ओपन, 5 अमेरिकन ओपन व 1 फ्रेंच ओपन जिंकले आहेत. आपल्या कारकिर्दीत त्याने तब्बल 103 ग्रॅंडस्लॅम आणि एटीपी असून विजेतेपदे जिंकली असून, दुहेरीत 2008 ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.