केंदूरमध्ये वृद्ध दांपत्य गंभीर जखमी ः दिड तोळा वजनाचे सोन्याचे दागिने लांबविले
शिक्रापूर- केंदूर (ता. शिरूर) येथे भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष संपत ऊर्फ बाळासाहेब कोंडीबा साकोरे यांच्या घरावर आज (सोमवारी) पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी मारहाण करीत चोरी केली. चोरट्यांच्या मारहाणीत साकोरे दांपत्य गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोंडीबा विठोबा साकोरे (वय 70) व लक्ष्मीबाई कोंडीबा साकोरे (वय 65) अशी चोरट्यांच्या मारहाणीत जखमी झालेल्यांची नावे आहेत. ते संपत ऊर्फ बाळासाहेब साकोरे यांचे आई वडील आहेत. ते त्यांच्या जुना घरामध्ये झोपलेले होते तर संपत व त्यांचा भाऊ रमेश साकोरे हे शेजारील घरात झोपले होते. पहाटे तीनच्या सुमारात रमेश यास जुन्या घराजवळ काही झटापट झाल्यासारखा आवाज आला. बाहेर पाहिले असताना त्यांना जुन्या घराच्या दरवाजा समोर कोणीतरी युवक उभा असल्याचे दिसले. रमेश यांनी आवाज देताच आणखी एकासह असे दोघे डोंगराच्या दिशेने पळून गेले. रमेश आरडाओरडा करत जुन्या घराकडे पळत गेले असताना त्यांना त्यांची आई लक्ष्मीबाई रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत दिसल्या. आईच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील कुड्या असे दीड तोळ्याचे दागिने चोरट्यांनी जबरदस्तीने काढून घेतले. असल्याचे दिसून आले, यावेळी रमेश यांनी आतल्या खोलीत झोपलेल्या त्यांच्या वडिलांना आवाज दिला परंतु त्यांचा काही आवाज येत नसल्याने आतमध्ये जाऊन पाहिले असताना त्यांना त्यांच्या वडिलांना देखील चोरट्याने मारहाण केल्यामुळे ते रक्ताने माखलेले दिसले.
यावेळी गंभीर जखमी झाले आहे. यामध्ये चोरट्यांनी एका तोळा सोन्याचे मंगळसूत्र व अर्धा तोळा सोन्याच्या कानातील कुड्या असा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सदाशिव शेलार, उपनिरीक्षक शिवशांत खोसे, सोमनाथ दिवटे, सहायक उपनिरीक्षक मधुकर खिलारे, महेंद्र शिंदे, पोलीस नाईक विलास आंबेकर, भास्कर बुधवंत, निखील रावडे, यांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकास देखील पाचारण करण्यात आले होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सोमनाथ दिवटे हे करत आहे.