- जबड्यामध्ये म्युकोरमायकोसिस
- वायसीएममध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
पिंपरी – करोनातून बरे झाल्यानंतरही मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये नवीन आजाराची लागण होत असल्याचे समोर आले आहे. करोनानंतर रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्याने मधुमेही रुग्णांच्या जबड्यामध्ये वरच्या बाजूला काळसर बुरशी तयार होत असल्याचे निष्पण झाले आहे. या आजाराला म्युकोरमायकोसिस असे म्हणतात. पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशा प्रकारचा रुग्ण आढळला असून या रुग्णावर वायसीएमच्या डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे.
करोनातून बरे झाल्यानंतरही रुग्णांमध्ये जबड्याच्या आजारांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहेत. यामध्ये जबड्याच्या वर असलेल्या हाडांच्या पोकळीत काळसर बुरशी तयार होते. जबड्याच्या हाडामध्ये ही बुरशी येत असल्याने ती शस्त्रक्रियेच्या माध्यमातून काढण्यात येते. मधुमेही रुग्णांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये रुग्णाला तीव्र डोकेदुखी, अंगात सतत बारीक ताप येणे. वरच्या जबड्यातील दातांचे हलणे. वरच्या टाळूला छिद्र पडणे अशी गंभीर लक्षणे दिसतात. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये अशा एका रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दंतरोग विभागप्रमुख डॉ. यशवंत इंगळे, कान, नाक, घसा विभागप्रमुख डॉ. अनिकेत लाठी व त्यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली.
यावर डॉ. इंगळे म्हणाले, म्युकोरमायकोसिस या आजारामध्ये काळसर अशा बुरशीचा संसर्ग वाढून प्रसंगी डोळ्यार्यंत आणि मेंदूपर्यंत प्रादुर्भाव होऊ शकतो. हवेतून प्रसार होणारे स्पोअर्स हे नाका तोंडातून शरीरात प्रवेश करतात. रुग्णाची प्रतिकारशक्ती क्षीण झालेली असेल आणि मधुमेही रुग्णाचे रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित असेल अशा रुग्णास कोविड उपचारा दरम्यान अतिप्रमाणात स्टेरॉइड आणि वायरल लोड, सायटोकाइन स्टॉर्म कमी करण्यासाठी रेमडेसिविर सारखे इंजेक्शन द्यावे लागते. यामुळे सिरम आयर्नचा लोड वाढतो. म्युकोरमायकोसिस ही बुरशी पर्यावरणात नैसर्गिक रित्या अस्तित्वात असते परंतु प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर या प्रकारच्या बुरशीचा शरीरामध्ये संसर्ग होतो. श्वासोच्छ्वासावाटे या बुरशीचे कण शरीरात गेल्यानंतर फुप्फुस तसेच वरच्या जबड्यातील सायनसमध्ये आणि वरच्या जबड्यामध्ये दुष्परिणाम होतो.