अवसरी-अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर सकाळी दहा वाजेपर्यंत मतदारांचा कमी प्रतिसाद होता. त्यानंतर मतदारांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. येथे 75.03 टक्के मतदान झाले.
आंबेगाव तालुक्यात गेले दोन दिवस भिजपाऊस पडत असल्याने वाडीवस्तीवरील रस्त्यावर पाणी साठल्याने सकाळी मतदानासाठी गर्दी कमी होती. सकाळी दहा, अकरा वाजल्यानंतर मतदारांनी रांगा लावून मतदान केले. अवसरी खुर्द येथे नऊ मतदान केंद्र आहेत. या नऊ मतदान केंद्रापैकी भोरवाडी मतदान केंद्र, श्री भैरवनाथ विद्यालय मतदान केंद, जिल्हा परिषद शाळा मतदान केंद, वायाळ मळा मतदान केंद्र या ठिकाणी अपंग मतदारांच्या वाहतुकीसाठी चार सायकलींची व्यवस्था करण्यात आली होती. अवसरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकच्या पटांगणात पाणी साठल्याने मतदान केंद क्रमांक 174 आणि 175 मध्ये जाणाऱ्या मतदारांना कसरत करावी लागत होती.