नवी दिल्ली – अध्यक्षांच्या निर्देशांचे वारंवार उल्लंघन केल्याचे कारण देत आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील नेते संजय सिंह यांना सोमवारी संसदेच्या उर्वरित पावसाळी अधिवेशन काळासाठी राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. संजय सिंह यांच्या निलंबनाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री आणि सभागृह नेते पियुष गोयल यांनी मांडला होता.
अध्यक्ष जगदीप धनखर यांनी या प्रस्तावासाठी सभागृहाची मंजुरी मागितली आणि सांगितले की संजय सिंह यांना “अध्यक्षांच्या निर्देशांचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे” निलंबित केले जात आहे. धनखर यांनी गेल्या आठवड्यात संजय सिंग यांना दिल्लीतील सेवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राच्या प्रस्तावित विधेयकाला वारंवार विरोध केल्याने त्यांना समज दिली होती.
परंतु आजही त्यांचा या विषयावरील गदारोळ सुरूच राहिला. आज संजय सिंह यांनी मणिपुरच्या विषयावरून सभागृहात अन्य विरोधकांच्या साथीने सरकारचा निषेध केला. व या विषयावर मोदींच्या सविस्तर निवेदनाची मागणी केली.