प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 18 -शहरात गेल्या अडीच महिन्यात पावसाने शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांनी पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले आहे. या खड्डेमय कारभाराची कबुली पालिकेनेच दिली असून, 1 जून ते 18 ऑगस्ट या 79 दिवसांत पालिकेने शहरात 11 हजार 706 खड्डे आढळल्याचा तसेच त्यातील 11 हजार 418 खड्ड्यांची दुरुस्ती केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या 79 दिवसांत पालिकेने दिवसाला सरासरी 145 खड्ड्यांची दुरुस्ती केली आहे. अद्यापही 288 खड्ड्यांची दुरुस्ती बाकी आहे. महापालिकेच्या पथ विभागाकडून शहरातील खड्ड्यांबाबत देण्यात आलेल्या माहितीमधून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
“त्या’ खड्ड्यांचा हिशेबच नाही
महापालिकेने जाहीर केलेले हे आकडे पथ विभागाने (मुख्य खात्याकडून) दुरुस्त केलेल्या खड्ड्यांचे आहेत. हे सर्व रस्ते 12 मीटरपेक्षा जास्त रुंदीचे आहेत. तर 12 मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांची जबाबदारी महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांकडे आहे. या क्षेत्रीय कार्यालयांनीही गेल्या तीन वर्षांत केलेले रस्ते आणि त्यावर पडलेले खड्डे याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी तीन ते चार वेळा स्वत: आदेश देत क्षेत्रीय कार्यालयांकडून मागविली होती. मात्र केवळ 9 क्षेत्रीय कार्यालयांनी सुमारे 1350 रस्त्यांची माहिती दिली असून, त्यावर किती खड्डे आहेत अथवा किती खड्डे दुरुस्त केले, याची एक अक्षरही माहिती दिलेली नाही. त्यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे सहा क्षेत्रीय कार्यालयांनी तर अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशालाच केराची टोपली दाखविली असून, तीन आठवडे झाले तरी रस्ते आणि खड्ड्यांची एक अक्षरही माहिती दिलेली नाही.
आतापर्यंत पाच कोटींचा खर्च
खड्डयांच्या दुरुस्तीसाठी पालिका प्रशासनाने जवळपास साडेपाच कोटींचा खर्च केलेला आहे. प्रत्यक्षात या रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण करून त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक होते. मात्र, यावर्षी शहरात जून महिन्यातही समान पाणी योजना, ड्रेनेज तसेच अत्यावश्यक सेवांच्या कामांसाठी खोदाई सुरूच असल्याने तसेच खोदाईनंतर रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरण अतिशय निकृष्ट करण्यात आल्याने रस्त्यांवर खड्डे पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी पालिकेस आतापर्यंत पाच ते साडेपाच कोटींचा खर्च मोजावा लागला आहे.