प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 18 -मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यांनी यंदा एकत्रित दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवाच्या आधी रंगणारा गोपाळकाला अर्थात दहीहंडीचा उत्सव यंदा अधिकच जोमाने साजरा केला जाणार आहे. या उत्सवाला करोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षांचा “खो’ बसला होता. त्यामुळे एक प्रकारे मरगळ आली होती. मात्र मंडळांमध्ये आता पुन्हा एकदा उत्साह संचारला असून, गणेशोत्सवाच्या तयारीच्या आधी दहीहंडीच्या उत्सवाचीही जोरदार तयारी मंडळांनी केली आहे.
लक्ष्मी रस्त्यावरील गुरूजी तालीम चौकात शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता या उत्सवाला सुरुवात केली जाणार आहे. हा उत्सव यंदा भव्यदिव्य स्वरुपात असणार आहे. गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त तथा उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी याविषयी माहिती दिली. या उत्सवात सर्व पुणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.