अन्न व औषध प्रशासन विभागाकडून; कारवाईचे संकेत
पुणे – ‘लॉकडाऊन’मध्ये अनेक व्यक्तींनी घरगुती व्यवसाय सुरू केले आहेत. खाद्यपदार्थ किंवा त्यासाठी लागणाऱ्या उत्पादनाची खरेदी-विक्री करण्याला अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) परवानगी असणे आवश्यक आहे. मात्र, नागरिकांकडून कोणतीही परवानगी न घेता हा घरगुती व्यवसाय केला जात असल्याने कायद्याने हा गुन्हा ठरू शकतो, त्यामुळे नागरिकांनी कायद्याच्या चौकटीत राहून छोट्या स्वरूपातील घरगुती व्यवसायासाठीचा परवाना काढून घ्यावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात आले आहे.
करोना विषाणूने पुण्यासह संपूर्ण राज्य आणि देशात शिरकाव केला. विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात “लॉकडाऊन’ जाहीर झाले ते आठ किंवा महिन्याभरासाठी नव्हे तर तब्बल पाच ते सहा महिने कडेकोट लॉकडाऊन होते. यामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. जगावे कसे? असा गंभीर प्रश्न हातावर पोट असलेल्यांपुढे उभा राहिला. तर, दुसरीकडे घरबसल्या करायचे काय? हा मोठा प्रश्न प्रत्येकासमोर उभा राहिला. त्यातूनच केक बनविणे, वेगवेगळ्या प्रकारचे पीठ तयार करून विकणे यासह अनेक घरगुती खाद्यपदार्थ विक्री सुरू झाली. त्यातून घरबसल्या रोजगार मिळाला.
मात्र, हा रोजगार मिळविताना तयार केलेले अन्नपदार्थ कितपत सुरक्षित आहेत, याकडे दुर्लक्ष होते. अशा व्यावसायिकांवर एफडीएची करडी नजर असते. कारण, खाद्यपदार्थ विक्रीसाठी संबंधित व्यावसायिकाकडे एफडीएचा परवाना असणे बंधनकारक आहे. मात्र, या घरगुती व्यवसायिकांना या परवान्याचा विसरच पडला तर काहींना त्याबाबत माहितीच नाही. त्यात एफडीएकडूनही माणूसकी दाखवत सध्याच्या परिस्थिती या व्यवसायातून कुटुंबाला हातभार लागत असल्यामुळे कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र, नागरिकांनी हा परवाना काढून घ्यावा, असे आवाहन एफडीए प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
केवळ 100 रुपयांत परवाना…
लॉकडाऊनमध्ये घरगुती स्वरूपातील छोट्या व्यवसायिकांकडून सिझनल व्यवसाय सुरू केले. या व्यवसायिकांनी तात्काळ ऑनलाइन परवाना काढून घ्यावा. केवळ 100 रुपयात हा परवाना मिळतो. ऑनलाइन अर्जासाठी आधार कार्ड, रहिवासी दाखला आणि दोन फोटो आवश्यक आहे. अर्ज केल्यानंतर दोन ते तीन दिवसांत हा परवाना मिळतो. गेल्या काही महिन्यांत छोट्या व्यावसायिकांकडून खाद्यपदार्थ विक्रीसाठी आवश्यक परवाना घेण्यासाठी अर्ज येत असून प्रत्येक व्यावसायिकांनी हा परवाना घेणे आवश्यक आहे, अशी माहिती एफडीएचे अधिकारी सुरेश देशमुख यांनी दिली.