नगर (प्रतिनिधी) – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे पाटील यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला जेरबंद करण्यात आज पोलिसांना यश आले.नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला हैद्राबाद (तेलंगणा) येथील एका हॉटेलमधून दरवाजाचे कुलूप तोडून पहाटे अटक केली.
जरे यांच्या हत्याकांडानंतर पसार झालेल्या संशयित मुख्य सूत्रधार बोठे याला लपण्यासाठी मदत करणार्या नगरमधील महेश वसंत तनपुरे (रा. सावेडी, नगर) व हैदराबाद येथील वकील जनार्दन अकोला चंद्रप्पा (रा. सारोमानगर, हैदराबाद), राजशेखर अंजय चाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरीफ यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. बोठे यास लपण्यासाठी मदत करणारी संशयित महिला आरोपी पी. अनंतलक्ष्मी वेक्कटम सुब्बाचारी (रा. हैद्राबाद, तेलंगणा) ही पसार झाली असून पोलीस पथक तिच्याही मागावर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रेखा जरे हत्याकांडात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या सहा आरोपींसह हत्याकांडानंतर बोठे यास लपण्यासाठी मदत करणार्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून, आरोपींची संख्या आता 11 झाली आहे. बोठे याला अटक करण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून सहा पथके कार्यरत होती, असेही पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे रस्त्यावरील पारनेर तालुक्याच्या हद्दीतील जातेगाव घाटात दोघा जणांनी गळा चिरून हत्या केली होती. त्या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत छडा लावत अत्यल्प काळात यातील पाच संशयित आरोपींना जेरबंद केले. त्यातील संशयित आरोपी सागर भिंगारदिवे यास ताब्यात घेतल्यानंतर जरे यांच्या हत्येची सुपारी देणारा मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याचे तपासात समोर आले. तथापि, तेव्हापासून बोठे पसार होता.
बोठे गेले साडेतीन महिने लपण्याची ठिकाणे बदलत होता. त्यात वेषांतर करून तो पोलिसांना गुंगारा देत होता. पसार असलेल्या काळात सर्वाधिक दिवस तो हैद्राबाद येथील बिलालनगरमध्ये लपून बसला होता. पोलिसांना येथील स्थळाचाही सुगावा लागल्याचे समजल्याने चार दिवसांपूर्वी त्याने तेथून जवळ असलेल्या चार ते पाच ठिकाणी स्थलांतर केले होते. मात्र, शेवटी हैद्राबादमधील बालाजीनगर भागातील एका हॉटेलमध्ये त्याला आज (शनिवारी) पहाटे अटक करण्यात आली.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, संभाजी गायकवाड, महिला पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक मिथुन घुगे, दिवटे, समाधान सोळंखे, पोलिस हेडकॉन्स्टेबल रवींद्र पांडे, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, राहुल गुंडू, अभिजित अरकल, महिला पोलीस कॉन्स्टेबल जयश्री फुंदे, संतोष लोंढे, गणेश धुमाळ, भुजंग बडे, सचिन वीर, सत्यम शिंदे, रणजित जाधव यांच्या पथकाने ताब्यात घेतले.
पुरवणी दोषारोपपत्र दाखल करणार
रेखा जरे खून प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी अटक केलेल्या पाच आरोपींविरुद्ध पारनेर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले आहे. आता बोठेच्या चौकशीतून जे निष्पन्न होईल, त्या आधारे पोलीस पुरवणी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करतील, अशी माहिती तपासी अधिकार्यांनी आज दिली. दरम्यान, या गुन्ह्यात बोठेच्या सहभागाविषयीचे अनेक भक्कम पुरावे पोलिसांनी गोळा केले असल्याचे ते म्हणाले.
बोठेच्या शोधार्थ सहा अधिकारी अन् 30 कर्मचारी
रेखा जरे हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार बोठे हैद्राबाद येथे लपला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्याचा शोध घेण्यासाठी नगरमधून सहा पोलीस अधिकारी व 30 कर्मचार्यांचा सहभाग असलेली सहा पथके हैद्राबादला गेली होती. तब्बल पाच दिवस ही सहाही पथके तेथे तळ ठोकून अनेक ठिकांनी छापे मारत होती. प्रत्येकवेळी अगदी चार ते पाच मिनिटांपूर्वी बोठे तेथून निघून जाण्यात यशस्वी होत होता. मात्र, पथकाने माघार न घेता शोध सुरु ठेवून अखेर त्याला ताब्यात घेतले. या मोहीमेत हैद्राबाद, सोलापूर, मुंबई क्राईम ब्रँच, मुंबई सायबरच्या पथकांची मदत झाल्याचे पाटील म्हणाले.
पैसे संपले अन् घोळ झाला!
बोठे याच्याकडील पैसेच संपल्याने त्याने नगरमधील महेश तनपुरे यास फोन करुन बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. मात्र, ज्या मोबाइलवरुन बोठे याने संपर्क केला, तो मोबाइल नंबर अगोदरच पोलिसांना मिळालेला होता. तथापि, तो मोबाइल नंबर बंद असल्याने पोलीस तपास रखडला होता. दरम्यान, पैशांसाठी बोठे याने फोन चालू केला अन् घोळ झाला. फोन चालू होताक्षणी पोलीस पथक पुन्हा अलर्ट झाले, अन् मिळालेल्या लोकेशनच्या आधारे बोठे लपून बसलेल्या ठिकाणी त्यांनी त्वरेने छापा घातला. त्यात बोठे अलगद पोलिसांच्या तावडीत सापडला.
हैद्राबादमध्येच 85 दिवस मुक्काम
पोलिसांचे हात आपल्यापर्यंत पोहचू नयेत, यासाठी हैद्राबादमध्ये गुन्हेगारांसाठी आश्रय स्थान असलेल्या बिलालनगर येथील प्रतिभा वस्तीतील एका हॉटेलात खोली क्रमांक 109 मध्ये बोठे नाव बदलून तसेच वेशांतर करून राहात होता. बी. बी. पाटील या नावाने त्याने हॉटेलच्या रजिस्टरमध्ये नाव नोंदविले होते. तसेच पोलिसांच्या माहितीनुसार बोठे हा तब्बल 85 दिवस हैद्राबाद येथेच मुक्कामी असावा, असा अंदाज आहे.
कुख्यात गुन्हेगाराचा मोबाइल नंबर वापरला
फरार काळात बोठे याने अनेक मोबाइल क्रमांकांचा वापर केला. त्यात 2018 मध्ये एका कुख्यात गुन्हेगाराने वापरलेल्या मोबाइल क्रमांकाचा देखील समावेश आहे. बोठे याने या मोबाइल क्रमांकाचा खुबीने वापर केला. बोठे याची फरार काळात सराईत गुन्हेगारालाही मागे टाकेल अशी वागणूक होती, अशी माहिती पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिली.
100 पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी
बोठेच्या अटकेसाठी पोलिसांनी आतापर्यंत जवळपास 100 पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी केली होती. नगरसह परजिल्ह्यांत, राज्यात, परराज्यातील लुधियाना, भटिंडा, चंदीगड, भोपाळ, छत्तीसगड, आदी ठिकाणीही छापेमारी करून बोठेचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही.
फाशीची शिक्षा व्हावी : रुणाल जरे
गुन्हेगार कितीही चलाक असला, तरी पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही. तसेच नगर पोलिसांनी दबाव झुंगारून बोठे याला ताब्यात घेतले. त्यामुळे सर्वसामान्यांना पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळतो, हे स्पष्ट झाले. आता आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
पत्रकार बाळ बोठे याची काही गुपिते रेखा जरे यांना माहित होती. त्यात जरे यांच्याकडून आपली बदनामी होऊ शकते, या भीतीतून संशयित मुख्य सूत्रधार बोठे याने रेखा जरे यांची सुपारी देऊन हत्या घडवून आणली, असा संशय आहे.
मनोज पाटील,
जिल्हा पोलीस अधीक्षक, नगर.