-विनोद मोहिते
इस्लामपूर – गावच्या यात्रेची शे-दीडशे वर्षाची ऐतिहासिक परंपरा मोडायची कशी ? असे म्हणत सुरुल ( ता. वाळवा. जि.सांगली) येथे श्री माणकेश्वर देवाचा रथ ओढणे सुमारे ७० जणांच्या अंगलटी आले. इस्लामपूर पोलिसांनी यात्रा-जत्रा बंदी आदेशाचा भंग करणाऱ्या गावच्या यात्रा कमिटीसह सत्तर जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे वाळवा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी जत्रा – यात्रा संदर्भातील बंदी आदेश दिला आहे. याचा भंग करून गर्दी जमवल्यास गुन्हे दाखल करू अशा आशयाच्या नोटिसा सर्व गावच्या सरपंचांना व प्रशासनाला दिल्या होत्या.
सुरूल ( ता.वाळवा ) येथील श्री माणकेश्वर देवाची यात्रा दरवर्षी असते. यात्रेत धार्मिक विधी, पूजा करण्यासाठी भाविक गर्दी करतात. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दि.४ मार्च ला सुरूल येथे सरपंच व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.
सरपंच कुंदाताई राजाराम पाटील यांना गावच्या यात्रेला बंधने असणारी नोटीस देण्यात आली होती. तरीही शुक्रवारी दि १२ मार्चच्या रात्री सव्वा दहाच्या सुमारास सुरूल ग्रामपंचायतीकडून ६० ते ७० लोक देवाचा रथ दोरखंडाने ओढत मंदिराच्या दिशेने येत असताना बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांना दिसले. तेव्हा पोलिसांनी त्यांना थांबवले.
यात्रेस लोकांची गर्दी जमवून रथयात्रा काढता येणार नाही, गर्दी करू नका असे बजावले. तरीही नागरिकांनी जिल्हाधिका-यांचा यात्रा संदर्भातील बंदी आदेशाचा भंग करून रथ माणकेश्वर मंदिरासमोर आणून लावला.
यामुळे पोलिसांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत सर्जेराव शंकर पाटील, महेश कैलास वायदंडे, निवृत्ती जगन्नाथ मदने, अशोक रंगराव पाटील, भगवान रघूनाथ पाटील, विक्रम सर्जेराव पाटील, दत्तात्रय मारूती पाटील, संग्राम विजय गायकवाड, माणिक परसू पाटील, शिवाजी परसू पाटील, पोपट रघूनाथ पाटील, शंकर कोळेकर, अभिजित सर्जेराव पाटील, महादेव तुकाराम बंडगर, किरण वसंत पाटील, संजय मारूती पाटील, नवनीत नानासो पाटील, जयवंत मारूती पाटील, सुशिल माणिक पाटील, बरमा बाळासो पाटील या २० जणांवर तसेच अनोळखी ५० ग्रामस्थांवर जिल्हाधिकारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सुर्यकांत निकम यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक श्रीकांत अभंगे करत आहेत. वाळवा तालुक्यात ७० ग्रामस्थांवर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे.
पोलिसांच्या समोरच गावकऱ्यांनी ओढला माणकेश्वर देवाचा रथ
सुरूल (ता.वाळवा ) येथे यात्रेसाठी माणकेश्वर मंदिराजवळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हयात धार्मिक जत्रा, यात्रा व उरूस भरवण्यास जिल्हाधिका-यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. या संबंधित गावकऱ्यांना बैठकीत सूचना दिल्या होत्या.
तरीही पोलिसांच्या समोरच गावकऱ्यांनी माणकेश्वर मंदिरासमोर देवाचा रथ ओढला. तालुक्यातील यात्रा असणाऱ्या ग्रामस्थांनी जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे अन्यथा पोलीस कारवाईला समोरे जावे लागेल असा इशारा पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिला आहे.