मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख थेट आधुनिक भारताचे राष्ट्रपिता असा केला. नागपुरातील एका कार्यक्रमादरम्यान अमृता फडणवीस यांनी सध्याच्या राजकारनासह विविध गोष्टींवर चर्चा केली. अमृता फडणवीस यांनी मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केल्याने नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील आता अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नागपुरात अभिरुप न्यायालयाचं आयोजन करण्यात आलं होत यावेळी अमृता फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. “महात्मा गांधी हे तेव्हाचे राष्ट्रपिता होते. मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता आहेत” असं अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या.खासदार राऊत यांनी देखील याबाबत भाष्य केलं आहे.
“मी यावर निशब्द झालो आहे”, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मी निशब्द आहे या सगळ्यांवर. नवीन नवीन ज्या भूमिका घेतल्या जात आहेत त्यावर मी निशब्द झालो आहे. मला सुचत नाही या विषयावर काय बोलावं असं स्पष्ट मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं. तसेच यावर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री बोलतील, मी यावर बोलणं योग्य नाही असंही राऊत यावेळी म्हणाले.