चिंबळी -खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये हिरवी मिरची, बटाटा व लसणाची विक्रमी आवक झाली. कांद्याची आवक घटूनही भाव स्थिर राहिले. बटाट्याची भरपूर आवक होवूनही भाव तेजीत आहेत. लसणाची भरपूर आवक झाल्याने भाव स्थिरावले. हिरव्या मिरचीच्या भावात घसरण झाली. गुरांच्या बाजारात म्हैस व शेळ्या मेंढ्यांच्या संख्येत वाढ झाली. एकूण उलाढाल 3 कोटी 90 लाख रुपये झाली.
कांद्याची एकूण आवक 8 हजार क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 3 हजार क्विंटलने घटली. कांद्याचा कमाल भाव 1,300 रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 1,500 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 500 क्विंटलने वाढूनही भावात 100 रुपयांनी वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव 1,600 रुपयांवरून 1,700 रुपयांवर पोहोचला.
जळगाव भुईमूग शेंगाची एकूण आवक 8 क्विंटल झाली. या शेंगांना 6 हजार रुपयापर्यंत भाव मिळाला. लसणाची एकूण आवक 30 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 3 क्विंटलने वाढल्याने भाव 5 हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 248 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 151 क्विंटलने वाढली. हिरव्या मिरचीला 7 ते 9 हजार रुपये असा भाव मिळाला.