नागपूर – नागपूर फ्लाइंग क्लबतर्फे डीजीसीएच्या वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची पूर्तता केल्यामुळे वैमानिक प्रशिक्षणाला मान्यता मिळाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा नागपूर फ्लाइंग क्लबच्या अध्यक्षा प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज दिली. डीजीसीएची मान्यता मिळाल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे.
नवी दिल्ली येथील नागरी विमान उड्डयण महासंचालनालयतर्फे वैमानिक प्रशिक्षणासाठी 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत मान्यता देण्यात आली आहे. नागपूर फ्लाइंग क्लब येथे प्रत्यक्ष वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका सुद्धा दाखल झाली होती.
नागपूर फ्लाइंग क्लब येथे 2017पासून वैमानिक प्रशिक्षण बंद होते. वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात व्हावी यासाठी प्रशासकीय पातळीवर सातत्याने प्रयत्न सुरु करण्यात आले होते. प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेले तज्ज्ञ मनुष्यबळ तसेच क्लबकडे असलेले सेसना ही चारही विमाने सज्ज करण्याच्या दृष्टीने प्राधान्य देण्यात आले होते.
तसेच उप मुख्य उड्डाण निर्देशक हे पद भरण्यासाठी उच्च न्यायालयाकडून विशेष परवानगी घेण्यात आली होती. त्यानुसार आवश्यक असलेली सर्व पदांची भरती करण्यात येवून विमानांची फिटनेस व मेन्टनन्स (एफटीओ) लायसन्स प्राप्त झाल्यानंतर नागरी विमान उड्डयण महासंचालनालयातर्फे प्रशिक्षणासाठी मंजुरी मिळाली असल्याची माहिती लवंगारे-वर्मा यांनी दिली.
नागपूर फ्लाइंग क्लबला प्रशिक्षणासाठी तसेच फ्लाइंग क्लब नव्याने सुरु करण्यासाठी डीजीसीएचे तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठातर्फे मिळालेल्या सहकार्याबद्दल विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आभार व्यक्त केले आहे.