दिवसभरात तिघे बाधित : बरे होणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ
भोर – भोर तालुक्यात मंगळवारी (दि. 4) तिघांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, तालुक्यातील आतपर्यंत 226 बाधितांपैकी 153 जण करोनावर मात करून घरी परतले आहेत, तर 7 मृत्यू झाला असून 66 जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती भोर तालुका पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे व गट विकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली.
भोर शहर, सारोळा, आणि निदान सांगवी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, आजपर्यंत 808 संशयितांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. भोर तालुक्यातील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना दिसत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. प्रशासनाने सुचवलेल्या मार्गदर्शक नियमांचे नागरिकांनी पालन केल्यास तालुका करोनावर विजय मिळवू शकेल.
करोनाला तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव आणि तहसीलदार अजित पाटील यांच्या आदेशानुसार प्रशासन रात्रंदिवस मेहनत घेऊन प्रयत्न करीत आहे; मात्र नागरिकांनी यासाठी सहकार्य करण्याची खरी गरज असल्याचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी सांगितले.