Flying Dutchman Ship । फ्लाइंग डचमन शिपबद्दल तुम्ही कधीतरी ऐकले असेलच. जर नसेल तर आज आपण या जहाजाच्या रहस्यांबद्दल बोलणार आहोत. गेल्या ४०० वर्षांपासून शापित होऊन हे भुताटकी जहाज समुद्रात भटकत असल्याचे मानले जाते. या शापित जहाजाबद्दल अनेक किस्से आहेत, ज्यामुळे ते नेहमीच चर्चेत असते. हे जहाज पाहणे अत्यंत अशुभ मानले जाते. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने ते समुद्रात पाहिले तर तो आणि त्याचे जहाज पूर्णपणे उद्ध्वस्त होते.
या शापित जहाजाबद्दल जगभरात अनेक दूरचित्रवाणी कार्यक्रम आणि लोकप्रिय चित्रपट देखील बनवले गेले आहेत. इतकेच नाही तर आतापर्यंत अनेकांनी ‘फ्लाइंग डचमन’ पाहिल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यांच्या दाव्यात किती तथ्य आहे, हे कोणालाच माहीत नाही. २०व्या शतकातील प्रसिद्ध लेखक “निकोलस मॉन्सेरेट” यांनी दुसर्या महायुद्धादरम्यान पॅसिफिक महासागरात पाहिल्याचा दावा केला होता.
फ्लाइंग डचमन जहाजाबद्दल विविध समजुती आणि अफवा आहेत. या जहाजाबद्दलच्या एका सामान्य समाजानुसार जहाजाचा खलाशी (कॅप्टन) हेन्रिक व्हॅन डी डेकेन होता. त्याला डचमन म्हणूनही ओळखले जात असे. असे म्हटले जाते की १६४१ मध्ये जहाजाचा कॅप्टन हेन्रिक वेन हॉलंडहून ईस्ट इंडीजच्या दिशेने जहाज घेऊन निघाला होता.
मात्र, सहलीनंतर जेव्हा तो त्याच्या प्रवाशांसह हॉलंडला परतायला लागला तेव्हा त्याने वाटेत काही बदल केले. त्याने आपल्या जहाजाला ‘कॅप ऑफ गुड हॉप’कडे वळविले. जहाजावर बसलेले प्रवासी कॅप्टनच्या या निर्णयावर खूप नाराज झाले कारण त्यांना लवकर घरी पोहोचायचे होते. पुढे जात असताना जहाजाला जोरदार वादळाचा सामना करावा लागला. या वादळात जहाज पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. या दुर्घटनेत जहाजातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. असे म्हणतात की जहाजातील सर्व मरणासन्न प्रवाशांनी या जहाजाला शाप दिला होता. तेव्हापासून हे भुताटकी जहाज समुद्रात भटकत आहे.
फ्लाइंग डचमन जहाजाचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही. अनेकांनी हे जहाज पाहिल्याचा दावा केला असला, तरी या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे आणि किती भ्रम आहे हे कोणालाच माहीत नाही. फ्लाइंग डचमन आजही एक रहस्य आहे.