नवी दिल्ली : ज्ञानवापी मशिदीतील आयोगाच्या कारवाईत सहकार्याचे आदेश न्यायालयाकडून आल्यानंतर आता शनिवार, १४ मेपासून सर्वेक्षणाचे काम सुरू होणार आहे. सर्वेक्षणासंदर्भात वाराणसीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त, हिंदू धर्माचे प्रतिनिधी आणि मुस्लीम प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. त्यात शनिवारपासून सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर इत्झामिया मस्जिद कमिटीने सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीत पोलिस आयुक्तांनी दोन्ही समाजातील लोकांना शांतता व सौहार्दपूर्ण वातावरण राखण्याचे आवाहन केले आहे. वाराणसी न्यायालयाने १२ मे रोजी ज्ञानवापी मशीद प्रकरणात १७ मेपूर्वी पुन्हा सर्वेक्षण सुरू करण्याचे आदेश दिले होते. याशिवाय आयुक्तांना हटवण्याचे अपीलही न्यायालयाने फेटाळून लावले होते.
आता या पाहणीवेळी आयुक्त उपस्थित राहणार आहेत. या सर्वेक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते. त्यामुळे आता कोणी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली करण्यात येणार आहे.
सर्वेक्षणाच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याशिवाय गेटची चावी न मिळाल्यास कुलूपही तोडले जाऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे. यासोबतच सर्वेक्षणादरम्यान व्हिडिओग्राफी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.