India Forex Reserves: परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी वाढ झाली आहे. RBI च्या आकडेवारीनुसार, 15 डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात परकीय गुंतवणुकीतील वाढीमुळे, परकीय चलन साठा 9.11 अब्ज डाॅलरने वाढून 615.97 अब्ज डाॅलर झाला आहे. हा साठा मागील आठवड्यात 606.85 अब्ज डाॅलर होता.
भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 रोजी परकीय चलनाच्या साठ्याचा डेटा जारी केला आहे. आकडेवारीनुसार, 15 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा $9.11 अब्जने वाढून $615.97 अब्ज झाला आहे. या कालावधीत परकीय चलनाच्या मालमत्तेत वाढ झाली असून ती 8.34 अब्ज डॉलर्सनी वाढून 545.04 अब्ज डॉलर झाली आहे.
आरबीआयच्या सोन्याच्या साठ्यातही वाढ झाली आहे. आरबीआयचा सोन्याचा साठा 446 दशलक्ष डाॅलरने वाढून 47.57 अब्ज डाॅलर झाला आहे. SDR 135 दशलक्ष डाॅलरने वाढून 18.32 अब्ज डाॅलर झाला आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये जमा केलेला साठा 181 दशलक्ष डाॅलरने वाढून 5.02 अब्ज डाॅलर झाला.
परकीय गुंतवणुकीत झालेली वाढ हे परकीय चलनाच्या साठ्यात वाढ होण्याचे एक प्रमुख कारण आहे. फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात वाढ न करण्याच्या निर्णयानंतर आणि 2024 मध्ये व्याजदर कपातीचे संकेत दिल्यानंतर देशात विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. नवीन वर्षात विदेशी गुंतवणुकीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर 2021 मध्ये परकीय चलनाचा साठा 645 अब्ज डॉलरच्या पातळीवर पोहोचला होता, त्यानंतर मोठी घसरण झाली होती. आता परकीय चलनाचा साठा त्यांच्या जुन्या उच्चांकापासून 30 अब्ज डॉलर्स दूर आहे.