पुणे – 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार रवींद्र शोभणे यांची एकमताने निवड करण्यात आली. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक पार पडली. या बैठकीत संमेलनाध्यक्षांची निवड तसेच संमेलनातील कार्यक्रम, ग्रंथप्रदर्शन आदी विषयांवर निर्णय घेण्यात आले.
यावेळी महामंडळाच्या कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पांगे, प्रा. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार, डॉ. दादा गोरे, डॉ. किरण सगर, प्रा. रामचंद्र काळुंखे, प्रदीप दाते, विलास माने विद्या देवधर, पुरुषोत्तम सप्रे, गजानन फडके उपस्थित होते. यंदाचे संमेलन दि. 2, 3 आणि 4 फेब्रुवारी 2024 रोजी अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे, असे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
संमेलनाध्यक्ष पदासाठी शोभणे, प्रवीण दवणे, डॉ. न. म. जोशी, बाळकृष्ण कवठेकर, ऋषीकेश कांबळे आदी नावांवर चर्चा करण्यात आली.
मात्र साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे डॉ. शोभणे यांच्या नावावर एकमत झाले. विशेष म्हणजे यावेळी साहित्य महामंडळाने साहित्यिकांचा सन्मान राखण्यासाठी साहित्य संस्थांनी अध्यक्षपदासाठी सुचविलेली नावे जाहीर न करण्याचा निर्णय घेतला होता. तरी काही नावांची चर्चा झाली. प्रारंभीपासून शोभणे आणि दवणे या दोघांपैकी एकाला अध्यक्षपदाचा बहुमान मिळणार हे स्पष्ट झाले होते. अखेर शोभणे यांच्या नावावर काल शिक्कामोर्तब झाला.
विविध पुस्तके प्रकाशित
शोभणे यांचा जन्म नागपूरमधील नरखेड तालुक्यातील खरसोली या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावी, तर उच्च शिक्षण नागपूर येथे झाले. “वर्तमान’, “दाही दिशा’, “शहामृग’, तद्धव’, “अदृष्टाच्या वाटा’ आदी कथासंग्रह, “पडघम’, “रक्तधृव’, “चिरेबंद’ आदी कादंबऱ्या त्यांच्या नावावर आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी विविध संमेलनांचे अध्यक्षपदही भूषविले आहे.