- आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे निवेदन सादर
कर्जत : कर्जत परिसरातील करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, करोना चाचण्यांची संख्या आणि निदानाचा वेग वाढविण्यासाठी सतीश जाधव यांनी कर्जत-खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे निवेदन सादर केले. करोना संशयितांच्या जलदगतीने चाचण्या करण्यासाठी दोन हजार रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किट देण्याची मागणी केली आहे. करोनाबाधित, संशयित रुग्णांचे तातडीने निदान व्हावे, या दृष्टीने उपयुक्त तसेच या किटद्वारे नागरिकांची तपासणी करण्यास सोयीस्कर होईल, यामुळे पाऊण तासात रुग्णाचा अहवाल प्राप्त होणार असून, करोना संसर्ग रोखण्यासही त्यामुळे मदत होणार आहे.
कर्जत तालुक्यात आणि शहरातील करोनाबाधित आणि संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. बाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी या किटचा फायदा होईल. आणि या किटद्वारे तपासणी केल्यानंतर पाऊण तासात त्याबाबतचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यामुळे करोनाबाधितांचे वेळेवर निदान करता येणे शक्य होणार असल्याचे मत सतीश जाधव यांनी मांडले आहे.
अँटिजेन चाचणीमुळे करोनाबाबतचे शहरातील चित्र बदलण्याची शक्यता आहे. करोना स्वॅब चाचण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर विषाणू विज्ञान संस्था, अन्य रुग्णालय, प्रयोगशाळा आणि खासगी प्रयोगशाळा यांच्यावर अवलंबून राहावे लागत आहे. अँटिजेन चाचण्या सुरू केल्याने हे अवलंबित्व कमी होईल.
एवढेच नव्हे, तर स्वॅब चाचणीसाठी नमुने दिल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त होईपर्यंत किमान एक दिवसाचा वेळ जातो. करोनाबाबत भीतीमुळे हा वेळ नागरिकांना तणावामध्ये घालवावा लागतो. अँटिजेन चाचणीसाठी नमुने दिल्यानंतर अल्पावधीतच त्याचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यामुळे सर्वार्थानेच अँटिजेन चाचणी महत्त्वाची ठरेल.
कर्जत तालुक्यातील पोसरी येथील शिवसेना कार्यालयात आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेऊन कर्जतमध्ये रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किट उपजिल्हा रुग्णालय तसेच सर्व रुग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे सतीश जाधव, नितीन लोवंशी, पंकज चंदनशीळे यांनी केली आहे.
रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किट काही रुग्णालयात उपलब्ध आहे. मात्र सर्वत्र उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून लवकरच रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किट उपलब्ध होण्याचा प्रयत्न करेल.
– महेंद्र थोरवे, आमदार
रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किटमुळे अधिकाधिक रुग्णाची चाचणी करूनतात्काळ रिपोर्ट प्राप्त होतो, त्यामुळे वेळ वाया न घालविता करोनावर जलद उपचार घेऊ शकतो. त्याची नितांत गरज आहे.
– सतीश जाधव