Randeep Hooda: अभिनेता रणदीप हुड्डाने (Randeep Hooda) बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. बॉलीवूडमध्ये मोठे यश संपादन केल्यानंतर रणदीप त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. तो गर्लफ्रेंड लिन लैशरामसोबत लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाची तारीखही समोर आली आहे. याची घोषणा खुद्द अभिनेत्याने सोशल मीडियावर केली आहे. त्यामुळे चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार 29 नोव्हेंबरला रणदीप लिनसोबत सात फेरे घेणारआहे. लग्न आणि सर्व विधी मणिपूरमध्ये होतील. २९ नोव्हेंबरला दुपारपासून सुरू होणारे लग्नाचे विधी रात्रीपर्यंत चालणार आहेत. मणिपूरच्या परंपरेनुसार हे कपल मणिपुरी पोशाख घालून लग्न करणार आहेत. काही जवळचे नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत मणिपूरमध्ये लग्न झाल्यानंतर अभिनेता रणदीप हुड्डा मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन देणार आहे. बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध चेहरे रिसेप्शनला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
रणदीप हुडाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये त्यांनी लग्नाची तारीख, स्थळ आणि रिसेप्शन आदींची माहिती दिली आहे. यात त्याने लिहिले की, ‘जसे अर्जुनने ‘महाभारत’मध्ये मणिपूरची योद्धा राजकुमारी चित्रांगदाशी लग्न केले, त्याचप्रमाणे आम्हीही आमच्या कुटुंबीय आणि मित्रांच्या आशीर्वादाने लग्न करणार आहोत. तुम्हा सर्वांना ही आनंदाची बातमी सांगताना खूप आनंद होत आहे की आम्ही 29 नोव्हेंबर 2023 रोजी लग्न करणार आहोत. आमचे लग्न मणिपूरच्या इम्फाळमध्ये होणार आहे. त्यानंतर मुंबईत रिसेप्शन होणार आहे.’
View this post on Instagram
पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, ‘आम्ही आमच्या आयुष्याचा एक नवीन प्रवास सुरू करणार आहोत, यासाठी आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे. यासाठी आम्ही तुमचे सदैव ऋणी आहोत’. या पोस्टवर यूजर्स अभिनेत्याचे अभिनंदन करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लिन ही मणिपूरची रहिवासी आहे आणि ती व्यवसायाने भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे.रणदीपची होणारी बायको ही त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. रणदीप हुड्डा 47 वर्षांचा आहे, तर लिन लैशराम 37 वर्षांची आहे. रणदीप हुड्डा यांनी 2021 साली लिनच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. रणदीपच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’मध्ये दिसणार आहे.