Rajyasabha Election 2024 – राज्यसभा निवडणुकांसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठीचा गुरुवार (१५ फेब्रुवारी) शेवटचा दिवस. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या ६ जागा रिक्त आहेत. या ६ रिक्त जागांसाठी भारतीय जनता पक्षातर्फे ३, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) व काँग्रेसतर्फे प्रत्येकी १ उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला आहे.
देशभरातील राज्यसभेच्या एकूण ५६ जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. अर्थात राज्यसभेची निवडणूक ही लोकसभा, विधानसभा व अन्य निवडणुकांपेक्षा अगदीच भिन्न असते.
लोकसभेची निवडणूक ५ वर्षांतून एकदा होत असते. राज्यसभेची निवडणूक मात्र दर २ वर्षांनी ३३ टक्के जागांसाठी घेण्यात येते. एकीकडे लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो. तर राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा ६ वर्षांचा असतो.
राज्यसभेवर सदस्यांची निवड कशी होते?
राज्यसभेच्या सदस्य संख्येची मर्यादा २५० इतकी आहे. यापैकी १२ सदस्यांची निवड ही थेट राष्ट्रपतींकडून करण्यात येते. कला, साहित्य, क्रीडा, विज्ञान इत्यादी क्षेत्रातील दिग्गजांचा यामध्ये समावेश असतो.
राज्यसभेचे उर्वरित सदस्य, राज्य व केंद्र शासित प्रदेशातून निवडले जातात. सध्या राज्यसभेचे एकूण २४५ सदस्य आहेत.
कोणत्या राज्यातून किती राज्यसभा सदस्य? | Rajyasabha Election 2024
राज्यातील लोकसंख्येनुसार त्या राज्यातील राज्यसभा सदस्यांची संख्या ठरते. उत्तरप्रदेशासारख्या मोठ्या राज्यातून राज्यसभेचे ३१ सदस्य निवडले जातात. तर गोव्यासारख्या छोट्या राज्यातून राज्यसभेत एक सदस्य पाठवण्यात येतो.
महाराष्ट्रामधून राज्यसभेचे १९ सदस्य निवडले जातात. यातीलच ६ सदस्यांची निवड येत्या २७ फेब्रुवारीला होणार आहे.
राज्यसभेचं गणित | Rajyasabha Election 2024
राज्यसभा निवडणूक लढवत असलेल्या उमेदवाराला त्या-त्या राज्यातील अथवा केंद्र शासित प्रदेशातील विधानसभा आमदार मतदान करतात. पण केवळ मतदान केलं की निवडणूक झाली असं नाही. त्यासाठी एक विशिष्ट गणित ठरवण्यात आलं आहे.
हे गणित आपण महाराष्ट्राच्या उदाहरणासह समजून घेऊयात, या गणितामध्ये एका आमदाराच्या मताला १०० इतकं मूल्य असतं. राज्यात विधानसभा सदस्यांची संख्या २८८ इतकी आहे. म्हणजेच आमदारांच्या मतांचं एकूण मूल्य झालं २८८००.
आता राज्यसभेच्या जितक्या जागा रिक्त आहेत त्यामध्ये १ मिळवायचा. आणि आता मतांच्या एकूण मूल्याला त्या राज्यातील रिक्त सदस्य संख्या + १ ने भागायचं.
महाराष्ट्रात सध्या ६ रिक्त जागा आहेत. म्हणजेच गणिताप्रमाणे, २८८०० ला ७ ने भागावे लागेल. उत्तर येतं ४११४. .
आता शेवटची स्टेप म्हणजे आलेल्या उत्तरात १ मिळवायचा. म्हणजेच ४११५.
प्रत्येक आमदाराच्या मताला १०० इतके मूल्य आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रातून यंदा राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला ५९ आमदारांची पहिल्या पसंतीची मतं आवश्यक आहेत.
महाराष्ट्रात राज्यसभा बिनविरोध? | Maharashtra Rajyasabha Election 2024
महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या ६ रिक्त जागांसाठी सहाचं अर्ज आले आहेत. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये बिनविरोध होणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.
भाजपतर्फे अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा, अजित पवार यांच्या राष्टवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.