राजकुमार राव आणि भूमि पेडणेकरचा आगामी “बधाई दो’ आता पुढच्या वर्षी जानेवारीत रिलीज होणार नाही. 28 जानेवारीत हा सिनेमा रिलीज होणार असल्याचे जाहीर झाले होते. मात्र प्रेक्षकांना आणखीन थोडा काळ या सिनेमाची वाट बघायला लागणार आहे.
“बधाई दो’चा रिलीज आठवडाभरासाठी पुढे ढकलला गेला आहे. आता हा सिनेमा 4 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. जंगली पिक्चर्स या प्रॉडक्शन हाऊसने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. व्हॅलेंटाइन डे असलेल्या महिन्यातच हा सिनेमा रिलीज होत असल्याबद्दल प्रॉडक्शन हाऊसने आनंद व्यक्त केला आहे.
राजकुमार राव एका महिला पोलीस ठाण्याच्या इन्सपेक्टरच्या रोलमध्ये आणि भूमि पेडणेकर एका शाळेच्या पीटी टीचरच्या रोलमध्ये आपल्याला दिसणार आहे.
या दोघांव्यतिरिक्त सीमा पहवा, शीबा चढ्ढा, लवलीन मिश्रा, नीतेश पांडे आणि शशी भूषण हेदेखील यातील लीड रोलमध्ये असणार आहेत. 2018 मधील “बधाई हो’चा हा सिक्वेल असणार आहे. मात्र यातील कलाकार आणि कथा पूर्णपणे भिन्न असणार आहे. “बधाई हो’मध्ये आयुष्मान खुराना, सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता हे मुख्य भूमिकेत होते.