थलैवा रजनीकांत लवकरच ‘जय भीम’ दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात मेगास्टार अमिताभ बच्चन देखील असणार असल्याची बातमी समोर येत आहे. हे दोन सुपरस्टार तब्बल ३२ वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. रजनीकांत स्टारर या चित्रपटात विशेष भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना अप्रोच करण्यात आल्याचे वृत्त आहे.
वृत्तानुसार, रजनीकांतच्या जवळच्या एका सूत्राने टीजे ज्ञानवेलच्या या नवीन चित्रपटाची माहिती दिली. या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांच्याशी बोलणी सुरू असल्याचे सूत्राने सांगितले. लवकरच या चित्रपटाची घोषणा होणार आहे. या चित्रपटासाठी अद्याप कोणत्याही अधिकृत करारावर स्वाक्षरी झालेली नाही, असे सूत्राने सांगितले. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत 1991 मध्ये आलेल्या ‘हम तुम’ या बॉलिवूड चित्रपटात हे दोघे शेवटचे एकत्र दिसले होते.
टीजे ज्ञानवेलचा हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे, ज्यामध्ये रजनीकांत मुस्लिम पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत. अमिताभ आणि रजनीकांत यांनी एकत्र काम केलेल्या चित्रपटांमध्ये ‘हम तुम’, ‘गिरफ्तार’ आणि ‘अंधा कानून’ यांचा समावेश आहे.
रजनीकांत सध्या ‘जेलर’ आणि ‘लाल सलाम’मध्ये व्यस्त आहेत. हे दोन्ही चित्रपट पूर्ण केल्यानंतर तो टीजे ज्ञानवेलच्या चित्रपटात व्यग्र होणार आहे. रजनीकांत यांचा हा १७० वा चित्रपट असल्याने त्याचे नाव सध्या थलायवा १७० असे ठेवण्यात आले आहे. यापूर्वी हा चित्रपट अभिनेता विक्रमला ऑफर करण्यात आला होता, मात्र आता त्याच्या जागी अमिताभ बच्चन दिसणार आहेत. अमिताभ बच्चन सध्या ‘सेक्शन 84’चे शूटिंग करत आहेत. रिभू दासगुप्ता याचे दिग्दर्शन करत आहेत.