Rajasthan Election 2023 – राजस्थानमधील सत्तारूढ कॉंग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजपने शनिवारी स्वतंत्रपणे लहान पक्ष आणि अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधला. त्यामुळे विधानसभा निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येला त्यांचा राजकीय भाव वाढल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
कुणालाही स्पष्ट बहुमत नसणारी त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास राजकीय पेच उद्भवू शकतो. तशा स्थितीचीही शक्यता विचारात घेऊन कॉंग्रेस आणि भाजप हे प्रमुख प्रतिस्पर्धी सक्रिय झाले आहेत.
त्यातून त्या पक्षांनी विजय मिळवण्याची शक्यता असलेल्या लहान पक्षांच्या आणि अपक्ष उमेदवारांवर गळ टाकले. ते आपल्याकडे येतील असा त्यामागचा उद्देश आहे.
गरज भासल्यास लहान पक्षांशी निकालानंतर हातमिळवणी करण्याची तयारीही कॉंग्रेस आणि भाजपने ठेवली आहे. तिकीटे नाकारण्यात आल्याने कॉंग्रेस आणि भाजपच्या सुमारे ४० नेत्यांनी आपापल्या पक्षांशी बंडखोरी केली.
ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले. आता निकाल जाहीर होण्याआधी त्यांचे महत्व पुन्हा वाढले आहे. अर्थात, निवडणुकीत कॉंग्रेस किंवा भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यास लहान पक्ष आणि अपक्षांना तितकेसे महत्व उरणार नाही.