मुंबई – संपूर्ण देश ‘राम चरण आणि ज्युनियर एनटीआर’ यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. या ऐतिहासिक चित्रपटातील ‘नाटु नाटु’ या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. या लोकप्रिय तेलुगू चित्रपटाच्या गाण्याने अनेक हॉलिवूड गाण्यांना मागे टाकत हे नामांकन पटकावले. बाहुबली फेम एस एस राजामौली यांचा आरआरआर हा चित्रपट साऊथ इंडस्ट्रीमधील सर्वात बिग बजेट चित्रपट होता.
‘बाहुबली’नंतर राजामौली यांनी पुन्हा एकदा ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करत अजय देवगण, राम चरण, एनटीआर अशी तगडी स्टारकास्ट मोठ्या पडद्यावर एकत्र आणली होती. त्यामुळेच सर्वत्र आरआरआरचा बोलबाला पाहायला मिळाला होता. ऑस्कर यादीत देखील स्थान पटकावल्यानंतर आता या चित्रपटाने गोल्डन अवॉर्डवर देखील आपली मोहर उमटवली आहे. या पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, नुकतंच सोशल मीडियावर या पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये दिग्दर्शक एसएस राजामौली आणि संगीत दिग्दर्शक एमएम किरवाणी यांनी ‘नाटु नाटु’ या गाण्यावर ठेका धरत आनंद साजरा केल्याचं दिसून येत आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे. कीरवाणी यांनी एका हातात पुरस्कार धरला होता, राजामौली आणि कीरवाणी यांनी एकत्रच ‘नाटू नाटू’ची हुक स्टेप करून दाखवत आहे.