पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नुकताच झालेला पुणे दौरा चर्चेचा ठरला. ठाकरे पुणे दौरा अर्धवट सोडून मुंबईला परतल्याने याबाबतची चर्चा सध्या सुरु आहे. ठाकरे दौरा अर्धवट सोडून मुंबईला परतल्याने त्यांची पुण्यातील सभा होणार का? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत होता. मात्र राज ठाकरे हे पुण्यामध्ये रविवारी २२ मे ला सभा घेतील अशी माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांची सभा पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे होईल.
दरम्यान, मंगळवारी पुण्यामध्ये दाखल झालेल्या राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये पुस्तक खरेदी केली होती. राज ठाकरे पुस्तक खरेदीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच तेथे माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी ठाकरे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा पारा चढल्याचं पाहायला मिळालं.
राज ठाकरे हे येत्या ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. अयोध्या दौऱ्यापूर्वी ते पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी घेणार होते.
मात्र राज ठाकरे यांना आपला पुणे दौरा काही कारणास्तव अर्धवट सोडून मुंबईला परतावे लागले होते. राज ठाकरे मुंबईला परतल्याने त्यांच्या पुण्यातील सभेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र आता ही सभा होणार असल्याची माहिती सुत्रांकरवी मिळाली आहे.