अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. गेल्या काही महिन्यांपासून तो नाराज होता. जनता या निर्णयाचे स्वागत करेल याची मला खात्री आहे, असे हार्दिक म्हणाला.
तर आज अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेत हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. काँग्रेस हा सर्वात जास्त जातीयवादी पक्ष असल्याची टीका हार्दिक पटेल यांनी केली आहे. यावेळी त्यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांवरही उत्तर दिले.
ते म्हणाले,’काँग्रेस पक्षात कार्याध्यक्षांच्या जबाबदाऱ्या केवळ कागदावर असून दोन वर्ष मी गुजरात काँग्रेसचा कार्यकारी अध्यक्ष होतो आणि या काळात मला कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. राज्य यूनिटच्या कार्यकारी अध्यक्षांना कोणतीही कर्तव्य सोपवली जात नाही.’
हार्दिक पटेल पुढे म्हणाले, राहुल गांधी जेव्हा जेव्हा गुजरातमध्ये येतात तेव्हा ते राज्याच्या एकाही प्रश्नावर बोलत नाहीत. राहुल गांधी इथे आल्यावर कोणता चिकन सँडविच द्यायचा किंवा डायट कोक वेळेत मिळतंय की नाही याकडे लक्ष देतात, अशी टीका हार्दिक पटेल यांनी केली.
तत्पूर्वी,हार्दिक पटेल यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पत्र सादर केला. अनेक प्रयत्नांनंतरही काँग्रेस पक्षाने देश आणि समाजहिताच्या विरोधात केलेल्या कामामुळे मी पक्षाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात लिहिले आहे.
तीन वर्षांत काँग्रेस सोडली
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेलने 12 मार्च 2019 रोजी काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. त्यानंतर अवघ्या 19 महिन्यांच्या प्रवासात हार्दिक पटेल यांना गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष बनवण्यात आले. मात्र हार्दिक पटेल काँग्रेस हायकमांडसमोर आपल्या मागण्या मांडत राहिला. गुजरात काँग्रेसच्या नेत्यांनी आपली कारकीर्द खराब केल्याचा आरोपही हार्दिकने केला.