औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर 1 मे रोजी सभा घेण्याची घोषणा केली होती. मनसेकडून या सभेची जय्यत तयारी सुरु करण्यात आली असून, मनसेचे काही पदाधिकारी देखील आज औरंगाबाद मध्ये दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे.
मागील पंधरा दिवसांपासून या सभेचे मनसेने वेगवेगळ्या पोस्टर्सच्या माध्यमातून काऊंटडाऊन सुरु करण्यात आले आहे. आता शहरात आणि सभेच्या ठिकाणी झळकवण्यासाठी मनसेचे लाखो ध्वज तयार केले जात आहेत. मनसेचे कार्यकर्ते यासाठी कामाला लागले आहे. तसेच, सभेची पूर्व तयारी पाहण्यासाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हेदेखील आज औरंगाबादमध्ये येत आहेत.
दरम्यान, सभेपूर्वी औरंगाबाद पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहरात 9 मे पर्यंत जमावबंदीचे आदेश पोलिसांकडून जारी करण्यात आले आहे. त्यामुळे निदर्शने, धरणे मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई आदेश लागू झाले आहेत. औरंगाबात पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार की नाही हे आता पहावे लागणार आहे.