Devendra Fadnavis – नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन, अशी ग्वाही देणारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांचा जुना व्हिडीओ प्रदेश भाजपने नुकतंच सोशल मीडियावरून प्रसिद्ध केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
राजकारणात पुन्हा कुठली उलथापालथ होणार का, या प्रश्नाभोवती फिरणाऱ्या चर्चांना उधाण आले. त्यानंतर बहुधा सत्ताधारी गोटात कुठला संशयकल्लोळ माजू नये याची खबरदारी म्हणून भाजपने तो व्हिडीओ डिलीट करण्याचे पाऊल उचलले.
महाराष्ट्रात 2019 या वर्षात विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी प्रचार करताना तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप सत्ता राखेल आणि नेतृत्वाची धुरा पुन्हा त्यांच्याकडे येईल याविषयी सातत्याने विश्वास व्यक्त केला.
त्यासाठी त्यांनी मी पुन्हा येईन या काव्याचा आधार घेतला. मात्र, निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्ताबदल झाला. सर्वांत मोठा पक्ष ठरूनही भाजपला सत्तेने हुलकावणी दिली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले.
ते सरकार कोसळून भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचा समावेश असणारे नवे सरकार सत्तेवर आले. मात्र, मुख्यमंत्रिपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले.
सध्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. त्यामुळे राजकीय अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. अशात फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेण्यासाठी नुकताच दिल्ली दौरा केला. त्या पार्श्वभूमीवर, प्रदेश भाजपने व्हिडीओ पोस्ट केल्याने मोठी राजकीय सनसनाटी निर्माण झाली.