पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत अखेर मोसमी पावसाला सुरूवात झाली आहे. बुधवारी चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.
सध्या कोकणात जोरदार पाऊस सुरू असल्याने मोसे खोऱ्यातून पानशेत धरणात पाणी येत आहे. दरम्यान, खडकवासला धरणसाखळीच्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांत बुधवारअखेर 7.10 टीएमसी पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत हे प्रमाण 6.55 टीएमसी होते.
पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी 6 पर्यंत खडकवासला-9, पानशेत-15, वरसगाव-23, तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 20 मिमी पावसाची नोंद झाली. तर, आजअखेर टेमघर-9, वरसगाव धरणात 18, पानशेत-33 टक्के, तर खडकवासला धरणात 42 टक्के पाणीसाठा आहे.
पुणेकर चिंब पावसाळी…
शहरात मोसमी पावसाने गेले दोन दिवस काहीशी विश्रांती घेतली होती. त्यानंतर बुधवारी मान्सून पुन्हा सक्रीय झाला. शहरात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. कात्रज, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, धायरी, खडकवासला, मध्यवर्ती पेठा, हडपसर, कोथरूड, बाणेर, पाषाण, शिवाजीनगर, येरवडा अशा सर्वच भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरू होती. शिवाजीनगर येथे दिवसभरात 3.2, तर लोहगाव, 2, कात्रज-आंबेगाव-11.2, खडकवासला-5, वारजे-6.4, कोथरूड-2.8 मिमी पावसाची नोंद झाली.