ओतूर -ओतूर (ता. जुन्नर) येथील हद्दीतील ठाकरवाडी येथे जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून 9 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी 15 जणांवर गुन्हा नोंदवून कारवाई केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी दिली.
ठाकरवाडी येथे जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पुणे ग्रामीण पथकाला मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक व ओतूर पोलिसांनी संयुक्तरित्या ठाकरवाडी येथील जुगार अड्ड्यावर मंगळवारी (दि. 12) छापा टाकून धडक कारवाई केली.
यामध्ये 12 वाहने व रोख रक्कम, असा एकूण 9 लाख 39 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बेकायदेशीर जुगार खेळल्याकामी 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 15 जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे.
कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस हवालदार शरद बांबळे, सुनील जावळे, पोलीस नाईक दीपक सावळे, चालक अक्षय नवले यांसह ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विकास गोसावी, कोकाटे, बनकर आदींनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.