जळोची – बारामती तालुका पोलिसांनी ठीकठिकाणी गावठी दारू अड्ड्यांवर छापे टाकून अवैध दारू विक्रेत्या 11 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर तडीपारीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत 133 लिटर गावठी व देशी-विदेशी दारूसह दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण 1 लाख 31 हजार 813 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शुभम संजय शिंदे, अलका रामचंद्र दुबळे, गिताबाई अशोक आढागळे, चेतन बाळू जाधव, विजय जनार्दन पवार, बाळासाहेब अनिल सावंत, रोहिदास रामचंद्र मदने, नाना कुंडलिक सोनवणे, आकाश दादासाहेब देवकाते, दिपाली विजय भिसे, वसंत दत्तात्रय गोफणे यांच्यावर कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तालुक्यातील पारवडी, तांदुळवाडी, घाडगेवाडी, झारगडवाडी, माळेगाव, सोनगाव, निरावागज, कटफळ येथील अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले.