शिंदेसेंनेतील शहाजीबापू पाटलांच्या कार्यालयावर छापा; ‘ओके मध्ये आहे’ म्हणत अंबादास दानवेंनी डिवचलं

Shahaji Bapu Patil | नगरपलिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आज रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच बड्या नेत्यांच्या आज सभा पार पडणार आहेत. अनेक ठिकाणी महायुतीमधील पक्षच एकमेकांविरोधात निवडणूक लढत असल्याचे दिसत आहे. याचदरम्यान आता सांगोल्यात महायुतीमधील वाद समोर आला आहे.
30 नोव्हेंबर रोजी रात्री सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने छापा टाकला आहे. यावेळी कार्यालयाची झाडाझडती घेतल्याने शिंदे सेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
सांगोल्यात भाजप, शेकाप आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी युती केली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे शहाजीबापू पाटील निवडणूक लढत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा सांगोल्यात झाल्या आहेत. माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी काही दिवसापूर्वी भाजपावर टीका केली होती. Shahaji Bapu Patil |
त्यानंतर काल मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा झाली. या सभेत फडणवीस यांनी बापूंवर कोणतीही टीका केली नाही. मात्र यानंतर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी लगेच सभा घेतली. या सभेत माजी आमदार पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ही सभा संपल्यानंतर काही वेळाने सांगोला येथील माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक भरारी पथकाने छापा टाकला. यावेळी कार्यालयाची झाडाझडती घेतली. यानंतर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. अशा पद्धतीने मित्र पक्षाच्या नेत्यावर टाकलेल्या छाप्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गुवाहाटीला जाताना ‘झाडी डोंगर हॉटेल’ गोड लागले. आता भाजप विरुद्ध ब्र शब्द उच्चरला की छाप्याची मालिका सुरू झाली. खाताना ऊस गोड लागला, आता तोच ऊस पेकाटात बसतो आहे. ‘ओके मध्ये आहे’, असं म्हणावंच लागेल आता बापू! #सांगोला #टोले
— Ambadas Danve (@iambadasdanve) December 1, 2025
ठाकरे अंबादास दानवेंनी डिवचले
यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी महायुतीला या छाप्यावरुन डिवचले आहे. दानवे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली. “गुवाहाटीला जाताना ‘झाडी डोंगर हॉटेल’ गोड लागले. आता भाजप विरुद्ध ब्र शब्द उच्चरला की छाप्याची मालिका सुरू झाली. खाताना ऊस गोड लागला, आता तोच ऊस पेकाटात बसतो आहे. ‘ओके मध्ये आहे’, असं म्हणावंच लागेल आता बापू!, असा टोला दानवे यांनी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना लगावला.
दरम्यान, सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात त्यांचे कट्टर विरोधक शेकापला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकत्र केलं आहे. मात्र विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजपने आपल्याला पाडण्यासाठी शेकापच्या उमेदवाराला मदत केली असा आरोप शहाजीबापू पाटील यांनी केला. Shahaji Bapu Patil |
हेही वाचा:





