Maharashtra Politics: महायुतीतील फोडाफोडीच्या नाराजी नाट्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील ‘अबोल्याचं’ चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. अमृता फडणवीस यांच्या ‘दिव्यज फाऊंडेशन’ आयोजित कार्यक्रमात दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते, मात्र त्यांच्यात संवाद झाला नाही. कार्यक्रमात फडणवीस आधीच स्थानापन्न झाले होते. त्यानंतर शिंदे आले. फडणवीसांनी उभे राहून त्यांना नमस्कार केला आणि बाजूला बसण्याचा हात केला. शिंदेंनीही उपस्थित व फडणवीसांना नमस्कार केला, पण त्यांनी फडणवीसांच्या बाजूच्या दोन खुर्च्या सोडून अंतरावर बसणे पसंत केले. या दोन मोकळ्या खुर्च्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासाठी राखीव होत्या. तरीही, दोन नेत्यांमधील हे अंतर राजकीय चर्चेला पुन्हा तोंड फोडणारं ठरलं. ठाणे, नवी मुंबईसह अन्य भागांत भाजपने शिवसेनेचे (शिंदे गट) नेते फोडल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जात आहे. पाटणा येथील नितीशकुमार यांच्या शपथविधी सोहळ्यातही दोन्ही नेत्यांमध्ये केवळ कोरडी औपचारिकता दिसून आली होती. भाजपच्या कथित फोडाफोडीच्या राजकारणावरून शिंदेंची नाराजी कायम असल्याची जोरदार चर्चा आहे.