Shahaji Bapu Patil : एक दिवस असा उगवेल आदित्य ठाकरेच उद्धव यांची साथ सोडतील..; ‘या’ बड्या नेत्याच्या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

सांगोला: अॅापरेशन टायगरच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक बडे नेते शिवसेना शिंदे पक्षात दाखल झाले आहेत. शिवसेनेकडून अॅापरेशन टायगर सक्रिय करण्यात आले असून आगामी काळात अनेकजण उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याचे दिसत आहे.
गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरेंना धक्क्यांवर धक्के बसताना दिसत आहे. नुकतेच ठाकरे गटाचे अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या राजन साळवी यांनी मशाल सोडून हाती धनुष्यबाण घेतले. त्यांच्या पक्ष प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
अशातच आता उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि वरळी विधानसभा मतदार संघाचे आमदार आदित्य ठाकरे हेच त्यांच्या वडिलांची साथ सोडण्याची भाष करतील, असे विधान शिवसेना शिंदे पक्षाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले आहे. त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
..तिथे थांबण्यात काहीही अर्थ नाही
माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना अनेक नेते ठाकरेंची साथ का सोडत आहेत असा प्रश्न विचारला असता, एक दिवस आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरे यांना सोडून जाण्याची भाषा करतील, अशी परखड प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कोणत्याही नेत्याच्या आमदाराच्या चौकशी झाल्या म्हणून ते पक्ष सोडत नाहीत. कालच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वास्तव परिस्थिती अशी झाली आहे की तिथे थांबण्यात काही अर्थ नाही अशी भावना त्यांच्या नेत्यामध्ये झाली आहे. त्यामुळे एक दिवस असा उगवेल की उद्धव साहेबांना सोडायची भाषा आदित्य ठाकरेच करतील, असे शहाजी बापू पाटलांनी म्हटले आहे. त्यांच्या या भाकिताची जोरदार चर्चा केली जात आहे.
उद्धव यांच्यापुढे पक्षातील ‘गळती’ रोखण्याचे मोठे आव्हान
विरोधी पक्षनेता म्हणून आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे येत असल्याचा प्रश्न त्यांना विचारला असता, याचे कारण म्हणजे ठाकरे गटाकडे संख्याबळ नाही. जरी त्यांना हे विरोधी पक्ष नेते पद दिले तरी महाराष्ट्रात अतिशय निकृष्ट काम करणारा विरोधी पक्षनेता म्हणून आदित्य ठाकरेंचे नाव गाजेल अशी प्रतिक्रिया देत शहाजी बापू पाटील यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक बडे नेते ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करताना दिसत आहे. ठाकरेंसाठी पक्षातील नेत्यांची गळती रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. अन्यथा त्याचा फटका उद्धव यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला बसू शकतो, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.





