Vishal Kalate: विशाल कलाटे यांच्या निवडीने भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
वाकडमध्ये ग्रामस्थांकडून त्यांचे जंगी स्वागत

हिंजवडी – भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते उपमहाराष्ट्र केसरी पै. विशाल (आप्पा ) कलाटे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ” स्वीकृत नगरसेवक” पदी निवड झाल्याने वाकड परिसरात भाजपा कार्यकर्त्यांनी एकत्र जल्लोष केला.
त्यांच्या निवडीचे संपूर्ण शहरात व जिल्ह्यात जोरदार स्वागत केले जात असून भावकी गावकीच्या राजकारणात पक्षाचे सक्रियपणे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला अखेर न्याय मिळाल्याच्या भावना अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या.
निवडीची घोषणा झाल्यानंतर, नगरसेवकांनी दिवंगत, माजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर आमदार शंकर जगताप, माजी आमदार अश्विनी जगताप, यांनी पेढे भरवून त्यांना शुभेच्छा दिल्या. वाकडमध्ये ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे, मुळशीच्या माजी सभापती आशालता कलाटे व कुटूंबियांनी तसेच गावातील जमलेल्या महिलांनी औक्षण केले.
यावेळी अभिमान कलाटे, आकाश बोडके, अक्षय कलाटे, सनी कलाटे, निखिल भंडारे, धनराज बोडके, पंकज भंडारे, विशाल व्हावळकर, आदी कार्यकर्त्यांनी एकत्र जल्लोष केला. भंडाऱ्याची उधळण व फटाक्याच्या अतिषबाजीने वाकड परिसरात दिवाळीनंतर पुन्हा दिवाळी साजरी झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाली.
विशाल कलाटे हे भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्षापासून सक्रिय आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पक्षाच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे कोणतेही पद नसतानाही त्यांनी वाकड परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या, अडीअडचणींसाठी सातत्याने पुढाकार घेतला.
त्यांच्या कामाची, पक्षनिष्ठेची आणि जनसंपर्काची दखल घेत त्यांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी मिळाली आहे. त्यामळे भाजपने जुन्या कार्यकर्त्याच्या योगदानाला योग्य सन्मान दिल्याची चर्चा वाकड परिसरात सुरू आहे. स्वीकृत सदस्यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने सकारात्मक भमिका घेत नागरिकांच्या समस्या सभागृहात मांडाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
” विशाल कलाटेनी महापालिकेत वाकडचे नेतृत्व करावं अशी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊंची मनापासून इच्छा होती. त्यांचे हे स्वप्न आमदार शंकरभाऊ जगताप यांनी शब्द देऊन पूर्ण केले. त्यामुळे पक्षाने दिलेल्या संधीचे सोन करून या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा सचोटीने प्रयत्न करणार आहे. ” – विशाल मनोहर कलाटे, नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक, भाजपा.
Metro : बाणेर-बालेवाडीत मेट्रो प्रवाशांना दिलासा; आठ ठिकाणी पार्क अँड राइड सुविधा





